Maharashtra Political News: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना टप्प्या टप्प्याने सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपरिषदा आणि काही नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज घोषणा केली.

या निवडणुकांची घोषणा होताच यावर राजकीय प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंपासून रोहित पवारांपर्यंत अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर चर्चेतील पाच प्रतिक्रियांचा आढावा घेऊया.

“तळपायाची आग मस्तकात गेली”

राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक जाहीर करताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी दुबार यादीच्या प्रश्नावर निवडणूक आयुक्तांनी जे उत्तर दिले आहे त्याचा व्हिडीओ पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, “आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हाताचे बाहुले आहे. दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांचे काय करायचे? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहावी. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन.”

“दुबार मतदारांवर निवडणूक आयुक्त बोलणार नसतील तर…”

निवडणूक आयोगाने नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, “निवडणूक आयुक्तांनी विधानसभेच्या दुबार मतदारांवर बोलताना सांगितले की, मी लोकसभा, विधानसभेच्या दुबार मतदारांबाबत बोलणार नाही. निवडणूक आयुक्तच बोलणार नसतील तर मग तत्कालीन अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी तरी विधानसभेतील दुबार मतदारांवर बोलतील करतील का? असो, आयुक्तांनी बोलण्यास नकार दिला असला तरी त्यांनी किमान आम्ही इतके दिवस पुरव्यासकट दुबार मतदारांचा जो विषय लावून धरला तो मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार!”

“राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरेल…”

राज्यात आजपासून नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज या निवडणुकांची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यात राष्ट्रवादी (अजित पवार) सर्वात मोठा पक्ष ठरेल असे वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, “अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची संकल्पना महाराष्ट्रासमोर मांडल्यानंतर त्याचा राष्ट्रवादी पक्षाला खूप मोठा फायदा झाला. आमचे पाच आमदार निवडून येणार नाहीत असे चित्र दाखवले जात असताना आमचे ४० हून अधिक आमदार विजयी झाले. अजित पवार यांनी, सर्व मंत्र्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर या निवडणुकीत आमची कामगिरी सर्वोत्तम असेल.”

दुबार मतदारांच्या मुद्द्यावर सत्ताधारी आमदाराची टीका

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “या निवडणुकांच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगरपालिकांना अध्यक्ष नाहीत, नगरसेवक नाहीत, त्यामुळे लोकांना कोणाला काम सांगावे कळत नव्हते. त्यामुळे या निवडणुका होणे महत्त्वाचे होते. मला वाटत नाही की हमीपत्र भरून घेतली जातील. कारणे बरेच लोक बाहेरगावी आहेत, ते केवळ मतदानासाठी येतात. माझ्या मदतदारसंघात ८ हजार मतदारांची दुबार नावे आहेत. सहा महिने मेहनत करून शोधून काढली आहे. दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार करण्यापेक्षा ती थेट वगळा ना.”

शिवसैनिकांची तयारी पूर्ण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसैनिकांची तयारी पूर्ण झाल्याचे वक्तव्य शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार संतोष बांगर यांनी एबीपी माझाशी बोलताना केले आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे.

आमदार संतोष बांगर म्हणाले की, “आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. आज निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. शिवसैनिकांची पूर्ण तयारी झाली आहे. आमच्याकडे सर्व उमेदवार आहेत. फक्त एबी फॉर्म जोडायचा आणि निवडणुकीला समोर जाऊन निवडून यायचे, इतपत आमची तयारी झाली आहे.”