चिपळूण : महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार मुंबईत ठरणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या सुरू झाल्या आहेत. नेत्यांच्या भेटीसाठी  इच्छुकांनी मुंबईत तळ ठोकला आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जिल्हा दौर्‍यानंतर या प्रक्रियेला अधिकच वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा दोन्ही बाजूनी निर्णय झाला आहे. मात्र, प्रत्येकाचे उमेदवार कोण असणार ? यावरच मोठी खलबते सुरू आहेत.

नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत. महायुतीच्या माध्यमातून घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीनही पक्षांनी आपले उमेदवार तयार केले होते. राष्ट्रवादीकडून मिलिंद कापडी, शिवसेनेकडून उमेश सकपाळ, सुधीर शिंदे यांचे नाव पुढे आले होते, तर भाजपकडून सहा नावे पुढे येत होती. यामध्ये मंगेश तांबे व विजय चितळे यांचे नाव चर्चिले जात आहे. मात्र, आता महायुतीचा निर्णय झाल्यानंतर तिनही पक्षांच्या इच्छुकांमधून उमेदवारीची लॉटरी कोणाला लागते? हे महत्त्वाचे आहे.

महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने रमेश कदम यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र, कदम हे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कशी कुठून मिळवतात या बाबत शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. दुसर्‍या बाजूला काँग्रेसकडून लियाकत शाह यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे, तर ठाकरे शिवसेनेकडून बाळा कदम यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे अद्याप देखील निश्चित झालेले नाही. महायुतीच्या उमेदवाराच्या निश्चितीनंतरच महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत हे चिपळुणात त्या बाबत चाचपणी करत आहेत.

दरम्यान, भाजपनेही नगराध्यक्ष पदावर आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे चिपळूण नगराध्यक्ष पदासाठी भाजपा तसेच शिंदे सेना यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विद्यमान उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांना चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपल्याच पक्षाचा हवा यासाठी ते देखील प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुतीत एकमत झाल्यास उमेदवार कोण? हे प्रश्नचिन्ह आहे. इच्छुकांमधून महायुती उमेदवार देणार की नव्याने आयात होणार या बाबत शहरात मात्र चर्चा रंगू लागल्या आहेत.

महायुती व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. ज्याला उमेदवारी हवी त्यांनी नेत्यांना भेटणे गैर नाही. शेवटी उमेदवार ठरवताना महायुतीचे सर्व नेते एकत्र निर्णय घेतील. तेव्हा इच्छुकांचे मतही आजमावून घेतली जातील.मिलिंद कापडी, शहर प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट