scorecardresearch

“माहीमचं मझार प्रकरण आणि राज ठाकरेंची सभा स्क्रिप्टेड मॅच, माझ्या हातात…” जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

Mahim Mazar case and Raj Thackeray Rally was a scripted match Said Jitendra Awhad
जाणून घ्या जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

माहिमचं मझार प्रकरण आणि राज ठाकरेंची सभा ही स्क्रिप्टेड मॅच होती. हे बघा माझ्या हातात एक पत्र आहे. हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांचं आहे. यामध्ये त्यांनी पोलीस बंदोबस्त कधी घ्यावा याची तारीख २३ मार्च लिहिलेली आहे. वरची तारीख २२ हाताने लिहिली आहे. याच दर्ग्याबाबत हिंदूहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे असताना सामनात पहिल्या पानावरही ही बातमी छापून आली होती असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

“काल राज ठाकरेंना कुणीतरी सांगितलं होतं तुम्ही असं बोला, मग परवा सकाळी ही मझार पाडण्यात येईल. मग सगळं श्रेय तुम्हाला मिळेल आणि तुमची हवा होईल. माझ्या हातातला पेपर त्याची साक्ष देतो आहे. स्क्रिप्टेड सभा म्हणजे स्क्रिप्ट लिहून दिलं जातं. पिक्चर वगैरे काढताना स्क्रिप्ट लिहून देतात ना तू हे घे आणि वाच. मग डायलॉग बोलण्याची एक स्टाईल असते. त्यासाठी एक कागद द्यावा लागतो तो हा कागद आहे” असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

स्क्रिप्ट रायटर पण मीच सांगायचा का?

जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केल्यावर कोण आहे स्क्रिप्ट रायटर असं त्यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “स्क्रिप्ट रायटरही मीच सांगायचा, बोलणाराही मीच सांगायचा मग तुम्ही काय करायचं?”असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला.

राज ठाकरेंनी भाषण केल्याने काही होत नाही

“राज ठाकरेंच्या भाषणाने काही होत नाही. त्यांच्या भाषणाने कुणी भडकत नाही, भडकवतही नाही. सगळ्या मराठी माणसांना कळलंय आता राज ठाकरेंबाबत. राज ठाकरे हे महाराष्ट्रातले सर्वात गोंधळलेले राजकारणी आहेत. पटकन कधीतरी शिंदेंच्या बाजूने बोलतात. कधी टीका करतात, कधी यांच्यावर टीका कधी त्यांच्यावर टीका करतात. तुम्हाला घरातल्या गप्पा मारण्यासाठी शिवाजी पार्क मैदान कशाला पाहिजे?” असाही प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

राज ठाकरेंचा आरोप काय? काय झाली कारवाई?

माहीमच्या समुद्रात अनधिकृतपणे दुसरा हाजीअली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केला होता. त्याबाबतची चित्रफितही दाखवली होती. ही मजार अनधिकृत असून ती तोडण्यात यावी. हे बांधकाम तोडले नाही तर आम्ही तेथे सर्वात मोठे गणपतीचे मंदिर उभे करु, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने रात्रीच आदेश काढून हे बांधकाम पाडून टाकण्याबाबत पावले उचलली. सकाळी आठ वाजता पोलीस आणि पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या पथकाची मदत घेत हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.

काय म्हटलं आहे माहीम दर्गा ट्रस्टने?

“राज ठाकरे यांनी मेळाव्यात ड्रोन व्हिडीओद्वारे दाखवलेली जागा ६०० वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं” असं माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर त्या जागेच्या आजूबाजूला अवैध बांधकाम झालं असेल तर त्यावर सरकारने जरुर कारवाई करावी असंही सोहेल खंडवानी यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 16:20 IST

संबंधित बातम्या