सातारा : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या आदेशानुसार बाधित भागात सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांना ७३ कोटी ५४ लाखांची तातडीने मदत देण्यात आली आहे.

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले. ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एसडीआरएफ) निश्चित निकषांनुसार वितरित केली जाणार आहे.

‎मकरंद पाटील यांनी सांगितले, की अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. राज्यात झालेला अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे एकूण ८४,३५६ शेतकरी बाधित झाले असून, सुमारे ७३,०६८ हेक्टर शेतीचे क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे.

महसूल, कृषी विभागाच्या वतीने पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, प्राप्त झालेल्या अहवालानुसार नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली, तसेच, पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यांत शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता ७३ कोटी ५४ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी आहे. नागपूर विभागासाठी (नागपूर, वर्धा, चंद्रपूर) – १३५६.५९ लाख रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी (हिंगोली) – १८.२८ लाख रुपये, पुणे विभागासाठी (सोलापूर) – ५९७९.१७ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

‎‘डीबीटी’ पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात येणार नाही. लाभार्थ्यांना मदतवाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे, तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळता करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. या मदतीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या आदेशानुसार बाधित भागात सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांना ७३ कोटी ५४ लाखांची तातडीने मदत देण्यात आली आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असेही पाटील यांनी सांगितले.