जालना : सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर स्थानकातून सुटण्याची वेळ असणाऱ्या मनमाड-नांदेड पॅसेंजर रेल्वे गाडीस केवळ सहा-सात डबे असल्याने या मार्गावरील छोट्या स्थानकांवरील प्रवाशांची गैरसाेय होत आहे. सकाळी सव्वासातला छत्रपती संभाजीनगर स्थानकातून सुटणाऱ्या आणि पुढे परभणीमार्गे जाणाऱ्या नगरसोल-काचीगुडा जलदगती गाडीनंतर ८ वाजून ४० मिनिटांनी मनमाड-नांदेड पॅसेंजर गाडी आहे. सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या या गाडीस सहा किंवा सातच प्रवासी डबे असतात. या अनारक्षित गाडीमध्ये छत्रपती संभाजीनगर स्थानकानंतर मुकुंदवाडी आणि जालना येथे मोठी गर्दी होते. गाडीस मालवाहतुकीचा डबाही असतो. सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या या गाडीस प्रवाशांची संख्या विचारात घेऊन आणखी किमान चार-पाच डबे वाढविण्याची मागणी नेहमीच होत असते. परंतु दक्षिण मध्य रेल्वे त्याकडे लक्ष देत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

विशेष म्हणजे दक्षिण मध्य रेल्वेने चालू जून महिन्यात तिरुपती-साईनगर शिर्डी विशेष गाडीस कायमस्वरूपी दोन डब्यांची वाढ केली. जालन्याहून सुटणाऱ्या साप्ताहिक गाडीस दोन डबे आणि नांदेड-निजामुद्दीन गाडीला चार डबे कायमस्वरूपी वाढविले. गेल्या एप्रिलमध्ये काचीगुडा-नगरसोल या गाडीस तीन आरक्षित डबे वाढविण्यात आले होते. परंतु मनमाड-नांदेड गाडी किमान आठ-दहा डब्यांची तरी का करण्यात येत नाही, असा सवाल मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जालना जिल्हा शाखेचे पदाधिकारी ॲड. डी. के. कुळकर्णी यांनी केला आहे. जालना शहर काँग्रेस अध्यक्ष शेख महेमूद यांनी सांगितले, की छत्रपती संभाजीनगर ते जालना हे ६३ किलोमीटरचे अंतर कापण्यास या गाडीस अनेकदा अडीच तास लागतात. जनशताब्दी आणि मराठवाडा एक्स्प्रेस, तसेच अन्य गाड्यांची क्रॉसिंग झाल्याने संभाजीनगर किंवा चिकलठाणा येथून या गाडीस तासभर उशीर होतो. त्यामुळे जालना येथून पुढे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनमाड-नांदेड पॅसेंजरच्या डब्यांमध्ये वाढ करण्याबाबत आपण रेल्वेच्या नांदेड विभाग व्यवस्थापकांना यापूर्वीच पत्र दिलेले असून, जालना येथील रेल्वेविषयक बैठकीतही या मागणीकडे त्यांचे लक्ष वेधले होते. आता पुन्हा एकदा याबाबत आपण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी बोलणार आहोत. डॉ. कल्याण काळे, खासदार, जालना