लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर पुन्हा राज्याच्या दौरेवर असलेले मनोज जरांगे-पाटील यांची गुरूवारी पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत करमाळा तालुक्यातील वांगी येथे लाखोची सभा झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा करमाळ्यातील ही सभा कायम लक्षात राहील, अशी कृतज्ञतेची भावना जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली.
काल बुधवारी संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या नियोजित सभेला पोहोचण्यासाठी जरांगे-पाटील यांना पहाटेचे चार वाजले. तरी देखील थंडीमध्ये कुडकुडत सुमारे लाखभर मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. यात दिवाळीसाठी माहेरी आलेल्या विवाहित मुलींची उपस्थिती उल्लेखनीय होती.
आणखी वाचा-“मराठ्यांचा ७० वर्षे घात झाला, षडयंत्र रचून…”, ओबीसी नेत्यांचा उल्लेख करत जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
वांगी गावचा परिसर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (बॅक वॉटर) मोडतो. त्यामुळे येथील पहाटेची थंडी प्रचंड कडाक्याची असते. याच गावात १०७ एकर क्षेत्रात मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी करमाळा, मढा, इंदापूर, कर्जत आदी भागातून काल दुपारपासून मराठा समाज हजारोंच्या संख्येने जमायला सुरूवात झाली होती. मात्र, जरांगे यांना पोहोचण्यासाठी उशीर झाला. ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोहोचले. मात्र, उशीर होऊनसुध्दा जरांगे यांचे तेवढ्याच उत्साहात स्वागत झाले. त्यांनीही पाच मिनिटांत भाषण आटोपते घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा ही करमाळ्याची सभा कायम लक्षात राहील. तुमचे जे प्रेम आहे, ऋण आहे ते अपण स्वतः आणि समस्त मराठा समाज कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले.