मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे-पाटील हे मागील नऊ दिवसांपासून जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावताना दिसत आहे. सध्या त्यांना सलाईन लावली आहे. या सर्व घटनाक्रमानंतर मनोज जरांगे यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने बारा वाजेपर्यंत काय असेल तो निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
मनोज जरांगे मागील नऊ दिवसांपासून उपोषण करत आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या प्रकृती काळजी वाटतेय का? असं विचारलं असता जरांगे पाटलांच्या पत्नी म्हणाल्या, “मलाही आता त्यांची थोडीशी काळजी वाटत आहे. सरकारनेही त्यांची काळजी घ्यावी. आज बारा वाजेपर्यंत सरकारने जो निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय घ्यावा. काल त्यांनी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. परंतु त्यांनी आणखी वेळ वाढवून मागितला. पण आज बारा वाजेपर्यंत सरकारने काय असेल तो निर्णय द्यावा, तरच ते उपोषण सोडायला तयार होतील.”
हेही वाचा- “आरक्षण देणार नाही, असं कोर्टानेही…”, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं विधान
जरांगे पाटलांच्या पत्नी पुढे म्हणाल्या, “सरकारमधील मंत्र्यांनी त्यांची समजूत काढणं, ही मंत्र्यांची मोठी चूक आहे. त्यांनी त्यांची चूक आपल्या मनात ठेवावी. कारण ते (मनोज जरांगे) कमीत कमी २२ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. हे मंत्र्यांनीही समजून घ्यायला हवं. मतदान जवळ आलं की हे मंत्री आपल्या खुर्चीसाठी लोकांच्या घरोघरी चकरा मारतात. पण आम्ही महाराष्ट्रातील अखंड मराठ्यांसाठी हे उपोषण करत आहोत.” ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.