देशात गाजत असलेल्या पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा संबंध नगर जिल्ह्यतील कर्जतशी जोडला गेल्याने जिल्ह्यत खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात आरोपी म्हणून मनोज खरात याचे नाव घेण्यात आले असून तो कर्जत तालुक्यातील आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यामध्ये ज्या सात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये कर्जत शहरातील यासीननगर येथील मनोज हनुमंत खरात याचे नाव आल्याने चर्चेला उधाण आले आहे. यासीननगरमध्ये पंचशील नावाचा त्याचा बंगला असून त्याचे आई-वडील येथे राहतात. त्याला एक भाऊ एक बहीण असून सर्व उच्चशिक्षित आहेत. वडील पाटबंधारे खात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असले तरी त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. मनोजचे बालपण यासीननगरमध्ये गेले असून तो अत्यंत मनमिळाऊ व शांत व्यक्तिमत्त्वाचा असून त्याने असे काही केले असेल यावर येथे कोणाचाच विश्वास बसत नाही.
आमच्या शेजारी राहणारा मनोज असे काही करूच शकत नाही तर त्याला फसवून या घोटाळ्यात अडकवले असल्याची शक्यता आहे असे ओंकार तोटे यांनी सांगितले,
कर्जत येथील त्याच्या राहत्या घरी कोणाची भेट होऊ शकली नाही. मनोज याने कर्जत व पिंपरी चिंचवड येथे शिक्षण घेतले असून तो पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत कार्यरत असताना त्याने या घोटाळ्यात संबंधित कंपनीला आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यात प्रमुख भूमिका पार पाडल्याची माहिती समोर येत आहे.
पंजाब नॅशनल बँकेमध्ये घोटाळा झाला आहे की नाही हे मला माहीत नाही मात्र या प्रकरणात माझा मुलगा मनोज हनुमंत खरात याचा काहीही संबंध नाही. या शाखेत माझा मुलगा क्लार्क आहे आणि त्याने बँकेच्या नोकरीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम केले आहे, असे असतानाही त्याचे नाव या प्रकरणात विनाकारण गोवले गेले आहे यामुळे आम्हाला खूप दु:ख वाटत आहे, लवकरच सत्य बाहेर येईल.
– हनुमंत खरात, मनोजचे वडील