लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. “राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे”, असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून संतप्तजनक प्रतिक्रिया येत असताना नुकतंच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या प्रिया बेर्डे यांनीही भाजपवर टीका केली आहे. “भाजपमध्येही अनेक दिग्गज कलाकार आहेत. हेमा मालिनी, स्मृती इराणी, अमृता फडणवीस, मग या सर्व महिलांबद्दलही तुम्ही असचं बोलणार आहात का?” असा संतापजनक सवाल प्रिया बेर्डे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिया बेर्डे नेमकं काय म्हणाल्या? 

“पक्षाचे नाव घेऊन ते जर रंगलेल्या गालांचे मुके घेणारे राष्ट्रवादी हा पक्ष आहे. तर मग आणखी काय समजायचं? इतर कोणताही पक्ष असू दे, भाजपमध्येही कलाकार आहेत. हेमा मालिनी, स्मृती इराणी, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील दिग्गज कलाकार आहेत. मग तुम्ही सर्वच महिलांच्या बाबत असे बोलणार आहात का?” असा प्रश्न प्रिया बेर्डे यांनी उपस्थित केला आहे.

“कुठल्याही महिलेबद्दल किंवा कलाकाराबद्दल हे बोलणं चुकीचं आहे. निंदनीय आहे. कधीही टीका करताना या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचे असतं. प्रत्येकवेळी आपण किती चांगले आहोत, हे दाखवण्यासाठी दुसऱ्याला नावं ठेवण कितपत योग्य आहे. यासाठी तुम्ही कोणती पातळी गाठता, याचे आता काहीही तारतम्य उरलेले नाही. राष्ट्रवादीत अनेक लोककलावंत, कलाकार जे कोणी आहेत, त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने काम केले आहे. करोना काळातही त्यांनी सिनेसृष्टीला मदत केली आहे,” असेही प्रिया बेर्डेंनी यावेळी सांगितले.

“करोना काळात तुम्ही आमच्या तोंडाचे रंग बघून, टीव्ही बघूनच तुम्ही मनोरंजन करत होतात आणि तुम्ही आता जर याबद्दल बोलत असला तर याचा निषेध करावा वाटतो. नृत्य कलावंत, लावणी करणाऱ्या स्त्रिया या अंगभर कपडे घालतात, ते तुम्हाला वावडं वाटतं, ही मानसिकता कधी बदलेल मला काहीही माहिती नाही,” असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

“चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तम वक्ते आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांना तारतम्य बाळगण्यासं सांगावं असा सल्ला मी देणार होते. मात्र त्यांनीच जर अशा नेतांची पाठराखण केल्याने मला फार वाईट वाटत आहे,” अशी टीकाही प्रिया बेर्डे यांनी यावेळी केली.

दरेकरांचं विधान नेमकं काय?

सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकरांनी नाव न घेता टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली होती. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दरेकर बोलत होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress priya berde comment and criticizes bjp pravin darekar for his statement on surekha punekar ncp nrp
First published on: 14-09-2021 at 17:07 IST