Combined Graduation Parade by Flight Cadets from Indian Air Force: “ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाने आपल्या अद्वितीय पराक्रमाचे शानदार उदाहरण प्रस्थापित केले. या मोहिमेत शत्रूवर अचूक, वेगवान आणि निर्णायक असा प्रहार करण्याची क्षमता हवाई दलाने दाखवून दिली”, या शब्दात भारतीय हवाई दलाचे चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.
२२ महिला कॅडेट्सची वायुसेनेत नियुक्ती
भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी शाखेच्या २३५ कॅडेट्सचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल दुंडीगल येथे वायुसेना अकादमीमध्ये आयोजित संयुक्त दीक्षांत संचलनावेळी त्यांनी हे मनोगत व्यक्त केले. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल फ्लाईट कॅडेट्सना वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी आढावा अधिकारी म्हणून प्रेसिडेन्ट्स कमिशन प्रदान केले. पदवी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये २२ महिलांचा समावेश होता, ज्यांना भारतीय वायुसेनेच्या विविध शाखांमध्ये नियुक्ती मिळाली आहे.
प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख हवाई अधिकारी एयर मार्शल नागेश कपूर आणि वायुसेना अकादमीचे प्रमुख एयर मार्शल एस. श्रीनिवास यांनी वायुसेनाप्रमुखांचे स्वागत केले. परेड कमांडरकडून आरओंना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर अतिशय प्रभावी संचलन करण्यात आले. दीक्षांत संचलनाच्यावेळी अतिशय उत्तम समन्वय आणि ताळमेळ राखत पिलेटस पीसी-७ एमके-टू, हॉक, किरण आणि चेतक हेलिकॉप्टर्स यांचा समावेश असलेल्या चार प्रशिक्षण विमानांनी हवाई सलामी दिली.
मराठी युवक जय सावंतचे प्रशिक्षण पूर्ण
या संयुक्त दीक्षांत संचलनात मराठी युवक जय सावंतचाही सहभाग होता. त्याने प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्याला प्रेसिडेन्ट्स कमिशन प्रदान करण्यात आले.
२०२१ साली एनडीएची परीक्षा उत्तीर्ण – पाहा तेव्हाचा व्हिडीओ
जय सावंतने १८ व्या वर्षीच अतिशय अवघड समजली जाणारी एनडीएच्या परीक्षेत यश मिळवले होते. जय सावंतचे प्राथमिक शिक्षण ठाण्यात झाले होते. त्यानंतर काही वर्षांसाठी तो वडोदरा येथे गेला. दहावी, बारावीतही त्याने घवघवीत यश मिळविले होते. अभ्यासासह क्रीडा क्षेत्रातही जयने नैपून्य मिळविले होते. लहानपणापासूनच देशसेवेची आस लागलेल्या जय सावंतने एनडीएच्या परीक्षेत यश मिळविल्यानंतर आता हवाई दलाचे प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.