सातारा : साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाली. याची माहिती देण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली संयोजन करणाऱ्या संस्था, मराठी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी संमेलन आणि मराठी भाषेच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. यावेळी सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

साताऱ्यात मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशनच्यावतीने ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. नियोजनाबाबत विविध बैठका सुरू आहेत. साताऱ्यातील संमेलनाच्या आयोजनातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मसाप शाहूपुरी शाखेचे उपाध्यक्ष विक्रम पाटील, महेश सोनावणे, उद्योजक प्रसन्न देशमुख, जनता बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते, संचालक अक्षय गवळी, मसाप शाहूपुरी शाखेचे सदस्य राजेश जोशी, वेदांत जोशी आणि मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे संमेलनाची तयारी गतिमान होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवेंद्रसिंहराजेंचे अभिनंदन

३२ वर्षांपूर्वी साताऱ्यात झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभयसिंहराजे भोसले होते. त्यानंतर आता होत असलेल्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे यांची निवड झाल्याचे विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवेंद्रसिंहराजे यांचे अभिनंदन केले.