नांदेड: मागील दीड महिन्यांतील अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यासारख्या मागास विभागाला जबर तडाखा बसला, तरी केंद्रीय मंत्री किंवा केंद्रातील अधिकार्यांचे पथक या विभागात फिरकले नाही, याकडे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांचे लक्ष नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याने वेधले आहे. तसेच खा.गांधी यांनी ओल्या दुष्काळाखाली असलेल्या मराठवाड्याचा दौरा करावा, असे सुचविले आहे.
नांदेडच्या भोकर मतदारसंघातील बारड येथील संदीपकुमार देशमुख हे ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान व त्यानंतर काँग्रेसमधील राहुल ब्रिगेडशी जोडलेले आहेत. नांदेड आणि अन्य जिल्ह्यांतील अतिवृष्टी आणि पिकांच्या प्रचंड नुकसानीनंतर मुख्यमंत्री, महसूल व कृषिमंत्री यांना देशमुख यांनी गंभीर स्थितीबद्दल अवगत केले होते. कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना २०१९ साली ज्या पद्धतीने विशेष मदत दिली गेली, तशी मदत देण्याची मागणी सर्वप्रथम देशमुख यांनी केली होती. नंतर अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्याच मागणी री ओढली.
२००६ साली नांदेड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीनंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंघ नांदेडला आले होते. यंदा नांदेडसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांवर निसर्गाचा कोप झाला; पण सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आपल्या केंद्रीय मंत्र्यांना पाचारण केले नाही तर काँग्रेस खासदारांनी लोकसभेतल्या आपल्या नेत्याकडे मराठवाड्याची दारुण अवस्था कळविली नाही. या पार्श्वभूमीवर संदीप देशमुख यांनी खा.राहुल गांधी यांना मंगळवारी एक सविस्तर पत्र इ-मेल तसेच अन्य माध्यमांतून पाठविले.
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान खा.राहुल गांधी आणि अन्य भारतयात्रींचे महाराष्ट्रातील आगमन प्रथम नांदेड जिल्ह्यात झाले होते. येथील चार मुक्कामांत त्यांनी सव्वाशे कि.मी.चा प्रवेश केला. नंतर हिंगोली-वाशिम-बुलढाणा जिल्ह्यांतून ही यात्रा मध्यप्रदेशात गेली. तो संदर्भ पत्राच्या प्रारंभी देत देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात १८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाल्याचे, ६५ व्यक्ती आणि शेकडो जनावरे दगावल्याचे तसेच इतर हानीही मोठ्या प्रमाणावर असल्याचे खा.गांधी यांना कळविण्यात आले आहे. केंद्र शासनाने या आपत्तीची दखलही घेतली नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पातळीवर हिमाचल प्रदेश, पंजाब आदी राज्यांतील आपत्तीचे वार्तांकन झाले; पण मराठवाड्यावरील मोठ्या आपत्तीची कोणी नोंद घेतली नाही, याबद्दल खंत व्यक्त करून देशमुख यांनी केंद्र सरकारच्या अनास्थेचाही उल्लेख केला. राज्य सरकारने केलेली मदत शेतकर्यांची थट्टा करणारी आहे. एकंदर गंभीर स्थिती बघता, मराठवाड्यातील आपत्तीग्रस्तांना धीर आणि दिलासा देण्यासाठी दौरा आखावा, अशी विनंती देशमुख यांनी पत्रामध्ये केली आहे.
जिल्हाधिकारी कचेरीत ‘त्या’ जी.आर.ची शोधाशोध
नांदेड आणि अन्य जिल्ह्यांतील नैसर्गिक आपत्तीनंतर २०१९ साली कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काढण्यात आलेल्या स्वतंत्र शासन निर्णयाची (जीआर) बाब संदीपकुमार देशमुख यांनी सर्वप्रथम समाजमाध्यमांतून समोर आणली. अनेक लोकप्रतिनिधींच्या निवेदनामध्ये या जी.आर.चा उल्लेख आला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात वरील जी.आर.ची मंगळवारी शोध मोहीम सुरू होती. नंतर या जी.आर.ची प्रत देशमुख यांच्या माध्यमातूनच मिळाली.