अकोले : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा अहिल्यानगर जिल्ह्याशीही जुना संबंध होता. वन खात्यातील नोकरीच्या सुरुवातीला त्यांनी काही काळ अकोले तालुक्यातील राजूर आणि संगमनेर तालुक्यातील बोटा येथे काम केले होते.
‘चकवाचांदण’ या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी राजूर व बोटा येथील दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत. या भागातील भंडारदरा, घाटघर, कळसुबाई या त्यांच्या आवडत्या स्थळांनाही ते नित्याने भट देत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अकोलेकरांनी आज या सर्व आठवणी जागवल्या.
नांदेड वन विभागातून बदलीने नगर विभागात विशेष कार्य अधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. नगर येथे मुख्यालय ठेवून त्यांना संगमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी आणि नेवासे येथील वनविषयक कामानिमित्त दौरे करावे लागत. काही महिन्यांनी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे त्यांची बदली झाली. बोटा येथे नवीन कार्यालय स्थापण्यापासून त्यांना सुरुवात करावी लागली. राहण्याची, जेवणाची आबाळ, कडाक्याची थंडी त्यामुळे येथे ते आजारीही पडले होते.
बोटा येथे त्यांनी महसूल विभागाकडून वनीकरणासाठी मोठे क्षेत्र वर्ग करून घेतले. श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील साखर कारखान्यांच्या मालकीच्या उसाच्या मळ्यातील झाडांच्या मोजणीचे काम त्यांनी केले. पायी प्रवास करीत ते संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आपेगावला गेले. बोटा येथून त्यांची बदली राजूर येथे झाली. कळसुबाई, भंडारदरा धरण, हरिश्चंद्रगड हा सर्व परिसर राजूर वनक्षेत्रात येतो. कार्याचे मुख्य केंद्र असल्यामुळे भंडारदरा येथे ते नियमित जात. संधिप्रकाशात भंडारदरा धरणाच्या भिंतीवर उभे राहून आभाळातून उडणाऱ्या वटवाघळांच्या थव्याकडे पाहणे हा आवडता छंद होता, अशी आठवण त्यांनी लिहून ठेवली आहे.
घाटघरच्या कोकणकड्याजवळ दाट झाडीत ब्रिटिशकालीन दुरवस्था झालेल्या विश्रामगृहाची त्यांनी दुरुस्ती करून घेत ते एखाद्या रात्रीच्या निवाऱ्यास योग्य असे केले. हे विश्रामगृह त्यांचे एक आवडीचे ठिकाण होते असे त्यांनी लिहिले आहे. कळसुबाई शिखर हे त्यांच्या आकर्षणाचे अजून एक ठिकाण. आठवड्यातून एकदा तरी ते त्या शिखरावर जात. कोतुळ भागात दौऱ्यावर जाताना किंवा परत येताना बऱ्याच वेळा ते हरिश्चंद्र गडावर जात. या भागातील स्थानिक आदिवासींना पाखरांची माहिती असल्याने त्यांच्याकडे पक्ष्यांच्या मराठी नावांची ते आवर्जून चौकशी करीत.
राजूरच्या सत्यनिकेतन संस्थेचे सचिव सर्वोदयी कार्यकर्ते भाऊसाहेब पाटणकर यांच्याबरोबर त्यांची ओळख झाली. त्यांच्या संग्रही चांगले ग्रंथ होते. ते आवर्जून चितमपल्ली यांना ग्रंथ वाचायला देत. चितमपल्ली यांना संशोधन क्षेत्रात अधिक रस होता. त्यामुळे आपली बदली संशोधन क्षेत्रात व्हावी म्हणून त्यांनी राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांकडे पूर्वीच विनंती अर्ज केला होता. त्याप्रमाणे लवकरच त्यांची पुणे येथे बदली झाली आणि राजूरशी असणारा उण्यापुऱ्या तीन महिन्यांचा त्यांचा संबंध संपला.