सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सेंट्रल टेक्स्टाईल टॉवेल कारखान्याला भीषण आग लागून त्यात कारखाना मालक आणि कामगारांच्या कुटुंबीयांसह आठ जणांचा बळी गेला आणि त्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. या दुर्घटनेतून प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व यंत्रणांची बैठक बोलावून गांभीर्याने चर्चा केली. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. एमआयडीसी परिसरातील एकूण सुरक्षेच्या दृष्टीने या समितीने सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करून दोन आठवड्यात सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी, रविवारी पहाटे सेंट्रल टेक्सटाईलला लागलेल्या भीषण आगीत कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी (वय ८७) यांच्यासह त्यांचे नातू, नातसून आणि एक वर्षाचा पणतू यांच्यासह चार कामगारांचा मृत्यू झाला होता. तब्बल बारा तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले होते.या दुर्घटनेनंतर सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेच्या उणिवांसह महावितरणची वीज यंत्रणा, एमआयडीसीतील खराब रस्ते व अन्य त्रुटी समोर आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महापालिका प्रशासन, महावितरण, अग्निशमन यंत्रणा, पोलीस, एमआयडीसी, महसूल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांची बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी शिवाजी राठोड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, संदीप कारंजे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, सोलापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी आदी उपस्थित होते. आगीची दुर्घटना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घडली असावी, अशी शक्यता पढदुणे यांनी व्यक्त केली.
दुर्घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणा तत्काळ धावून आली, असा दावा करतानाच, दुर्घटनास्थळी बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांना जाण्याकरिता रस्ता नव्हता, अशी सबब पडदुणे यांनी पुढे केली. असा दावाही त्यांनी केला. कारखान्यात मोकळ्या जागेमध्ये पाण्याचे बंब सहजपणे जाणे कठीण होते. त्यामुळे शेवटी जेसीबी मागवून कारखान्याची भिंत पाडण्यात आली आणि त्यानंतरच बचाव कार्याला आणि आग नियंत्रणात आणण्याला गती मिळाली, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.
तथापि, अग्निशमन दलाच्या यंत्रणेला मर्यादा असल्याची बाब समोर आली. अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तातडीने पाठपुरावा केला जाईल, असे पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या बंबांना पाणी भरण्यासाठी अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात वॉटर फीडर पॉईंट निर्माण करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्याने दिले.
सोलापूर शहराच्या लोकसंख्येचा विचार करता अग्निशमन यंत्रणेला मर्यादा पडल्या आहेत. त्या दृष्टीने अग्निशमन दल अद्ययावत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पाण्याच्या बंबांची संख्या वाढविण्यात येणार असून बंबांमध्ये पाणी भरण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सोयीनुसार किमान पाच वॉटर वॉटर फिडर पॉईंट उभारले जाणार आहेत.-डॉ. सचिन ओंबासे, आयुक्त, सोलापूर महानगरपालिका
अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सेंट्रल टेक्सटाईलला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची चौकशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केली जाणार आहे. ही समिती दोन आठवड्यात चौकशीसह कृती आराखडा सादर करणार आहे.-कुमार आशीर्वाद,जिल्हाधिकारी, सोलापूर