कोळसा कामगार ते नक्षलवादी चळवळीचा मास्टर माईंड, मोस्ट वॉन्टेड नेता

रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

गडचिरोली : मध्यप्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यातील नक्षल चळवळीचा मास्टर माईंड, अशी ओळख असलेला जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे हा मूळचा यवतमाळ जिल्हय़ातील वणी तालुक्यातील राजूर येथील रहिवासी आहे. चंद्रपूर जिल्हय़ात धोपटाळा सास्ती खुल्या कोळसा खाणीत कार्यरत असलेल्या मिलिंद १९८४ मध्ये नक्षल चळवळीकडे आकर्षित झाला. त्याचा नक्षल चळवळीचा देशातील मास्टर माईंड ते मोस्ट वॉन्टेड नक्षली असा प्रवास मोठा थरारक आणि रंजक आहे.

दहावी व त्यानंतर आयटीआय पर्यंत शिक्षण झालेल्या मिलिंद तेलतुंबडे याचा जन्म ५ फेब्रुवारी १९६४ रोजी यवतमाळ जिल्हय़ात झाला. १९८४ मध्ये राजुरा तालुक्यातील सास्ती धोपटाळा खुल्या कोळसा खाणीत एक कामगार म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांने पद्मापूर खुल्या कोळसा खाणीत काम करीत असताना त्याचा संपर्क अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या राज्य सचिव अ‍ॅड. सृजन अब्रहम हिच्याशी आला आणि त्याच क्षणी तो नक्षल विचारसरणीकडे आकर्षित झाला. त्यानंतर संयुक्त खदान मजदूर संघ, इंडियन माईन वर्कर फेडरेशन या संघटनेच्या माध्यमातून कामगार चळवळीत सहभाग घेतला. १९९४ च्या अगोदर त्याने नवजीवन भारत सभा या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले. नक्षल चळवळीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर चंद्रपूर, वणी, उमरेड, नागपूर कोळसा पट्टय़ात डिव्हीसीएम म्हणून काम केले. येथून त्याने नक्षलवादी चळवळीत उंच झेप घेतली व त्यानंतर थेट राज्य स्टेट समितीचा सदस्य झाला. श्रीधर श्रीनिवासन याच्या अटकेनंतर महाराष्ट्र राज्य स्टेट समितीचा सचिव म्हणून पदोन्नती मिळाली. त्यानंतर २०१२ मध्ये उत्तर गडचिरोली, गोंदिया, बालाघाट विभागाचा डिव्हीजन प्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर लगेच समोरच्या वर्षी केंद्रीय समितीच्या चौथ्या अधिवेशनामध्ये पदोन्नती होऊन माओवाद्यांच्या सेंट्रल समितीचे सदस्यत्व मिळवले. महाराष्ट्र स्टेट समिती बंद करून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड या नवीन झोनची स्थापना करण्यात आली व त्याचे नेतृत्वाची जबाबदारी मिलिंद याच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर २०२१ मध्ये केंद्रीय समिती सदस्य व महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड झोनचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. गडचिरोली, गोंदिया, बालाघाट व राजनांदगाव या जिल्हय़ांमध्ये पोलिसांच्या हालचालीचे बारकाईने विश्लेषण करून त्याच्यावर मोठे मोठे अ‍ॅम्बुश, ब्लास्टींग व हिंसक घटना घडवून आणण्याबाबत नियोजन करणे व अंमलात आणणे यात मिलिंदचा हातखंड होता. महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्यप्रदेश या नवीन झोनची निर्मिती करून त्या भागात नक्षलवादी चळवळ अधिक सक्रिय करून पुनर्जीवित करणे व नक्षलवादी चळवळीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्याला महाराष्ट्र स्टेट समितीचे सचिव पद देण्यात आले होते. विशेष म्हणजे शहरी भागात नक्षलवादी चळवळीचा सहभाग वाढविण्यात मिलिंदचा मोठा सहभाग होता. मिलिंद याच्यावर असंख्य गुन्हे दाखल असून यामध्ये प्रामुख्याने ४२ चकमकी, सात खून, पोलिसांचे चार खून, जाळपोळ, दरोडा अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ांसह गडचिरोली जिल्हय़ात साठपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. १ मे महाराष्ट्र दिनीचा जांभुळखेडा ब्लास्ट घडवून आणण्याचा मास्टर माईड मिलिंद होता, त्यात पंधरा पोलीस शहीद झाले होते. कोपर्शी चकमकीत त्याचा सहभाग होता, तिथे एक जवान शहीद झाला होता. भिमा कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी त्याची पोलिसात नोंद आहे, विशेष म्हणजे मिलिंदचे कुटुंब उच्चविद्याविभूषित असून त्याचे नातेवाईक, भाऊबंध मोठय़ा पदावर कार्यरत आहे. तर त्याची पत्नी त्याच्यासोबत नक्षल चळवळीत सहभागी होती. तिला पुणे पोलिसांनी पुणे येथे अटक केली होती. सध्या ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

यवतमाळ नक्षल सेलकडूनही नक्षलवादी मिलिंद वॉन्टेडहोता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यवतमाळ : गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा झाला आणि यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यात असलेले त्याचे राजूर (इजारा) हे मूळ गाव पुन्हा प्रकाशझोतात आले. नक्षली कारवायांमध्ये आघाडीवर असलेल्या मिलिंद तेलतुंबडे हा यवतमाळ नक्षल सेललाही ‘वॉन्टेड’ होता. पोलीस दलाने त्याच्या शिरावर ५० लाखांचे बक्षीस ठेवले होते. मात्र मृत्यूला गाठेपर्यंतही तो पोलिसांच्या तावडीत न सापडता नक्षली कारवायांमध्ये सक्रिय राहिला. यवतमाळ जिल्ह्यातही त्याने नक्षल चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जहालमतवादी अनेकांच्या भेटीगाठी घेऊन वणी तालुक्यात नक्षल केंद्र उभारण्याचा प्रयत्न त्याने वारंवार केला. मात्र यवतमाळ नक्षल सेलने नेहमीच त्याचे मनसुबे उधळून लावल्याने येथे तो सक्रिय होऊ शकला नाही. नक्षल दलममध्ये आघाडीवर असतानाही त्याने वणी तालुक्याशी संबंध कायम ठेवले होते. तो मूळगावी राजूर (इजारा) येथे येऊन जात होता. मात्र प्रत्येकवेळी तो पोलिसांना चकमा देऊन पसार होत होता. वणी येथे अनेकदा वशांतर करून तो वावरल्याचीही माहिती आहे. काही वर्षांपूर्वी वणीत झालेल्या एका विशिष्ट साहित्य संमेलनात तो काही जहाल विचारसरणीच्या सहकाऱ्यांसमवेत आल्याचेही सांगण्यात येते. त्यावेळी त्याने अनेक व्यक्तींशी चर्चा करून नक्षल चळवळ कशी योग्य आहे, ते पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. राजूर (इजारा) येथे त्याचे नातेवाईक असतात. त्याला चार भाऊ, दोन बहिणी आहेत.