हिंगोली : विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षाने कर्जमाफीवर कोणतेही आश्वासन दिले नव्हते. जाहीरनामा नीट तपासून बघा. मुख्यमंत्री व बच्चू कडू यांची लवकरच भेट होईल आणि कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा होणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी पत्रकारांच्या बैठकीत बोलताना दिली. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास व दिव्यांग कल्याणमंत्री अतुल सावे यांनी शनिवारी हिंगोलीत पत्रकारांची बैठक घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात देशात काय प्रगती झाली, याची माहिती दिली.
या वेळी त्यांनी विकसित भारत, सेवा सुशासन, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, आयुष्यमान योजना, भारत-पाकिस्तान युद्धानिमित्त ऑपरेशन सिंदूर आदी विषयांवर माहिती दिली. आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे, फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.
या वेळी झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकारांनी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नावर बच्चू कडू यांचे उपोषण सुरू आहे. भाजपने निवडणूक काळात कर्जमाफी देऊ, अशी घोषणा केली होती. त्या कर्जमाफीच्या प्रश्नाचे काय, असा प्रश्न केला असता, पक्षाने कर्जमाफीचे आश्वासन दिले नव्हते, असे म्हणत सावे यांनी पत्रकारांना जाहीरनामा काढून बघावा, असे म्हटले. भाजप प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष बावनकुळे यांनी नुकतीच बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्री व बच्चू कडू यांची लवकरच भेट होईल, असे सावे म्हणाले. आणि कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चेअंती मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सावे म्हणाले.
विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षाने कर्जमाफीवर कोणतेही आश्वासन दिले नव्हते. जाहीरनामा नीट तपासून बघा. मुख्यमंत्री व बच्चू कडू यांची लवकरच भेट होईल आणि कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा होणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी पत्रकारांच्या बैठकीत बोलताना दिली.