केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्य सरकारवर करोना काळात संथ गतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकारने काय दिलं नाही याबाबत राज्यातील कुणी मंत्र्याने लेखी द्याव, असंही म्हटलं. राज्याने मागणी करूनही केंद्र सरकारने दिलं नसेल, तर मी या राज्याची हक्काची मुलगी म्हणून ती माहिती मला द्या, असंही भारती पवार यांनी नमूद केलं.

डॉ. भारती पवार म्हणाल्या, “राज्य सरकार मागतं आणि केंद्र सरकार देत नाही असं राज्यातील कुणी मंत्र्यांनी लेखी दिलं तर मलाही बरं होईल. आम्ही किती निधी दिलाय आणि त्यातील किती निधी राज्यात खर्च झाला हा पण प्रश्न उपस्थित होतो. केंद्र सरकारने आयसीयू बेड, ऑक्सिजनची क्षमता, औषधं यासाठी निधी मंजूर केलाय. प्रत्येक जिल्ह्याला औषधांचा साठा उपलब्ध पाहिजे. याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून (NHM) देखील औषधांची मागणी करता येते.”

“केंद्राने दिलं नसेल, तर मी या राज्याची हक्काची मुलगी म्हणून सांगते…”

“हे सर्व पाहता राज्य सरकारने किती मागणी केली? त्यानंतरही केंद्राने दिलं नसेल तर मी या राज्याची हक्काची मुलगी म्हणून सांगते मला तरी द्या. राज्य सरकारने काय मागणी केली आणि केंद्र सरकार काय देत नाही याबाबत आम्हाला आजपर्यंत कुठलंही पत्र मिळालं नाही. उलट आम्ही हे दिलंय आता हे खर्च करा म्हणून सांगत आहे. राज्यात काम चालू आहे. राज्य सरकार काम करत नाही असा माझा अजिबात आक्षेप नाही, परंतू संथगतीने काम चालू आहे,” असा आरोप भारती पवार यांनी केला.

हेही वाचा : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही? आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितला ‘तो’ एक निकष, म्हणाले…

“आज आपण लवकर काम केले नाही, तर उद्या धावपळ होईल. राज्य सरकारने थोडी गती वाढवावी अशी माझी विनंती आहे,” असंही भारती पवार यांनी नमूद केलं.

दरम्यान, राज्यातील परिस्थितीवर बोलताना राजेश टोपे म्हणाले, “३ जानेवारीचे आकडे पाहिले तर साडेबारा हजारपेक्षा अधिक करोना रूग्ण आहेत. मुंबईमध्येच ९ हजारच्या दरम्यान रूग्ण आहेत. ४ जिल्ह्यांमध्ये ९० टक्के रूग्ण आहेत. बाकीच्या राज्यात कुठेही इतके रूग्ण नाहीत. त्यामुळे जिथं रूग्ण नाहीत तिथं लॉकडाऊन येण्याचा संबंध येत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“उपलब्ध बेडपैकी ४० टक्के बेड भरले तर लॉकडाऊनचा विचार”

“अद्याप राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत कोणताही विषय चर्चेला नाही. उपलब्ध बेडपैकी ४० टक्के बेड भरले तर लॉकडाऊनचा विचार करतो,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.