पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अशा वेळी दर्शनासाठी येणाऱ्या मंत्री, अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफ्यामुळे कोंडी होत असल्याने यात्रा काळात अशी वाहने थेट मंदिरापर्यंत आणण्यावरही बंदी घातली असल्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे सांगितले. याशिवाय आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजा सुरू असताना भाविकांना मुखदर्शन सुरू ठेवण्याच्या सूचना केल्याचे गोरे यांनी या वेळी सांगितले.
पालकमंत्री गोरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आषाढी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला. या वेळी आमदार समाधान आवताडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य जळगावकर महाराज, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर गोरे बोलत होते.गोरे म्हणाले, की मंदिर समितीकडून यात्रेची तयारी, नियोजन गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. या कामांचा आढावा, अडचणींची आजच्या बैठकीत माहिती घेतली. मंदिरातील जतन आणि संवर्धनाचे नियोजित काम २४ तारखेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही गोरे यांनी सांगितले.आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजेवेळी पदस्पर्श, मुखदर्शन बंद ठेवण्यात येते. मात्र यामुळे दर्शनासाठी थांबलेल्या वारकऱ्यांना ताटकळत राहावे लागते. यासाठी यंदापासून एकादशी दिवशी शासकीय महापूजा सुरू असताना भाविकांना मुखदर्शन सुरू ठेवा, अशा सूचना करण्यात आल्याचेही गोरे यांनी या वेळी सांगितले.
मंदिर परिसरात वाहनांना बंदी : जिल्हाधिकारी
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात, तसेच आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार यात्रा कालावधीत भाविक लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातच मंदिर परिसरात चारचाकी, दुचाकी वाहन आल्याने भाविकांना येजा करण्यात अडथळे निर्माण होतात. आपत्कालीन परिस्थितीत मंदिर परिसरात रुग्णवाहिका, अग्निशमन अशी वाहने आणण्यामध्येही अडथळा निर्माण होतो. या अनुषंगाने चौफाळा ते महाद्वार (मंदिर परिसर) हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. तसेच दर्शनाला येणारे मंत्रिमहोदय, अति महत्त्वाच्या व्यक्तींची वाहनेही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थांबवली जातील अशी माहितीही आशीर्वाद यांनी दिली.