अहिल्यानगर: गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात आठ दिवस विविध भागांत विशेषतः दक्षिणेत अतिवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झाली. गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरल्याने पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत. आज, बुधवारी एकाच दिवशी तीन मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत अतिवृष्टीने ७२१ गावे बाधित झाली. तर एकूण २ लाख ३ हजार १०६ हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका २ लाख ८९ हजार ६०० शेतकऱ्यांना बसला. आत्तापर्यंत ३० टक्के क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे जिल्हा यंत्रणेकडून पूर्ण करण्यात आले आहेत.

अतिवृष्टीने केवळ शेतीपिकांचे नुकसान झाले नाही तर पशुधन मृत्युमुखी पडले, घरांची पडझड झाली. पूल व रस्ते वाहून गेले. पाझर तलाव फुटले, वस्ती, घरात पुराचे पाणी शिरून नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना पाचारण करावे लागले. सुमारे १ हजारावर लोकांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करावे लागले.

जिल्ह्याचा दक्षिण भाग कमी पर्जन्यमानाचा ओळखला जातो. त्याच भागात अतिवृष्टीने दहा दिवसांत सरासरीच्या जवळपास दीडपट पाऊस झाला. त्यातुलनेत पाटपाण्याने समृद्ध असलेल्या उत्तर भागात पावसाने अद्याप सरासरीही गाठलेली नाही. सन २०२१ मध्येही जिल्ह्याच्या दक्षिण भागाला अतिवृष्टीने झोडपले होते.

दि. १२ सप्टेंबरपासून अतिवृष्टीला सुरुवात झाली. त्याच्या दोन-तीन दिवसांनंतर लगेचच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पाथर्डी व शेवगावमध्ये जाऊन तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी कर्जत व जामखेडमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर पुन्हा अतिवृष्टीचा जोर वाढला, तो सोमवारी सकाळपर्यंत टिकून होता. त्यामुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी व बुधवारी काही भागांत हलक्या सरी झाल्या. त्यामुळे आता पूर परिस्थिती ओसरू लागली आहे. मात्र, शेतांमध्ये पाणी साठले आहे.

आज पालकमंत्री विखे व पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांनी कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेवगावमधील वरुर व पाथर्डीतील करंजी येथील नुकसानग्रस्तांची भेट घेत दिलासा दिला. काल सभापती राम शिंदे यांनी जामखेडचा दौरा केला. तसेच खासदार नीलेश लंके यांनी पाथर्डी, कर्जत व जामखेड येथे भेटी दिल्या.

कृषिमंत्री भरणे यांनी आज शेवगाव पाथर्डीमध्ये बोलताना येत्या १० दिवसांत पंचनामे पूर्ण केले जातील व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले. नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांनी धैर्याने संकटाला तोंड द्यावे, असे आवाहन केले. तर अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री विखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या दौऱ्यात दिल्या.

३० टक्के पंचनामे पूर्ण

कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीचा तडाखा जिल्ह्यातील ७२१ गावांना बसला. त्यामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र २०३१०६.४६ हेक्टर आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या २८९६०० आहे. संगमनेर, अकोले व कोपरगाव वगळता उर्वरित सर्व १२ तालुक्यांतील गावे बाधित झाली. सर्वाधिक फटका कर्जत, जामखेड, नेवासे व शेवगाव या तालुक्यांना बसलेला आहे. दरम्यान, कृषी विभागाने नुकसान झालेल्या भागातील ३० टक्के पंचनामे पूर्ण केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.