सांगली : बालपणी खेड्यापाड्यात चालत असलेल्या विविध पारंपरिक खेळांचे दर्शन मिरजेतील सुदान जाधव या अभियंत्याने गणेशमूर्तीच्या सजावटीतील देखाव्याद्वारे बालगोपालांसह पालकांनाही घडवले आहे. हा देखावा पाहून आमदार सुरेश खाडे यांनीही बालपण जागृत झाल्याचे सांगत कौतुक केले.

सध्या मुले मोबाईलच्या दुनियेत स्वत:ला विसरत असून, बैठ्या खेळामुळे अंगमेहनत करायला प्रोत्साहन देणारे मैदानी खेळ लुप्त होत आहेत. यामुळे मानसिक आरोग्यबरोबरच शारिरीक आरोग्यही धोक्यात येत आहे. हे ओळखून मिरजेतील सुदान जाधव याने बालपणीच्या गावगाड्यात एका पैशाचाही खर्च न करता खेळता येणारे खेळ गणेश भक्तासमोर ४० चौरस फुटाच्या जागेत बाहुल्यांच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहेत.

सामाजिक प्रबोधन करणे हा सुदान जाधव यांच्या देखाव्याचा मुख्य हेतू असतो. यावेळी त्यांनी तरुणांना जुन्या आणि हरविलेल्या खेळांची आठवण देण्याचा प्रयत्न आपल्या देखाव्यातून केला आहे. यामध्ये आंधळी कोशिंबीर, मामाचं पत्र हरवलं, लंगडी, दोरी वरच्या उड्या, गोट्यांचा खेळ, चोर पोलीस, फुगडी, मासे पकडणे, विटी- दांडू, पाण्यात कागदी नाव सोडणे, सागरगोटे, झोपाळा, टायर पळविणे, लगोरी, भोवरा या विस्मृतीत जात असलेल्या खेळांना गणेशोत्सव देखाव्यासमोर बाहुल्यांच्या माध्यमातून मांडले आहेत. खेळांना उठावदारपणा आणण्यासाठी कौलाची घरे, शाळा, शाळेचे मैदान हेही प्रदर्शित केले आहे. या खेळामुळे व्यायामाबरोबरच मुलांमध्ये संघभावना प्रदर्शित होते. तसेच शरीर तंदुरुस्त राहण्यासही हे खेळ आवश्यक ठरत असल्याचे प्रबोधन या माध्यमातून केले जात आहे.

पारंपरिक खेळ आणि तेही विनाखर्च खेळता येतात, याची माहिती बालगोपालांना तर होतच आहे. याचबरोबर पालकांनाही जुन्या खेळाच्या आठवणी या निमित्ताने होत आहेत. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी भेट देऊन या खेळाचे प्रदर्शन पाहून विसरलेल्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्याची भावना व्यक्त केली.

अभियंता जाधव याने आत्तापर्यंत प्रबोधनात्मक देखाव्यावरच भर दिला आहे. त्याचे काही देखावे जिह्यातील नामवंत स्पर्धा आयोजकांकडून कौतुकास पात्र ठरले आहेत. कोरोना कालावधीत त्याने सादर केलेला शिवकालीन बारा बलुतेदार देखावा विशेष कौतुकास पात्र ठरला होता. त्यानंतर शिवरायांचे शिलेदार हा देखावा सादर करुन त्याने तानाजी मालूसरे, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक शूरवीरांची फौज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत होती, हे दाखवून दिले होते. त्यानंतर देशातील १२ ज्योतिर्लिंग मंदिरे हुबेहूब साकारुन एकाच ठिकाणी ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविण्याचा त्याने प्रयत्न केला होता.