सातारा: तुमच्या सगळ्यांच्या मनात पुढे काय आहे, निर्णय घ्या, आपण कुठल्या पक्षात जायचं, या प्रश्नांना उत्तर देताना मी सांगेन आपले मूळच ‘अपक्षा’चे आहे. तरीही मी कुठल्या पक्षात जाणार नाही असेही नाही, आपल्या सर्वांसाठी कुठला पक्ष हे गौण आहे, असे वक्तव्य फलटण येथील आढावा बैठकीत आमदार रामराजे यांनी केले.

या वेळी माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे निंबाळकर, विश्वजितराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रामराजे म्हणाले, की कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडून शब्द पाहिजे. माझे वय झाले, तरी माझे सगळे व्यवस्थित चालू आहे. तुम्ही विचारता मेळाव्यात एवढे लोक गोळा होतात, तरी पराभव का होतो? याचे कारण प्रशासन, पोलिसांवर दबाव टाकून राजकारण सुरू आहे. कंत्राटदारांची देयके अडवली जात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते घाबरून तिकडे जात आहेत. पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी साठी आपण आढावा बैठक बोलावली होती परंतू कार्यकर्त्यांचा सूर नगरपालिका , जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे झुकला.

चिमणराव कदम सत्तेत होते. त्यानंतर राजे गट सत्तेत होता, पण आपण सत्तेचा कधी त्रास दिला नाही. सत्ता सत्तेच्या ठिकाणी, तर निवडणुका निवडणुकीच्या ठिकाणी. पण सध्या सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाकडून त्रास दिला जातोय. आता आगामी निवडणुका तुमच्या-माझ्या अस्तित्वाच्या आहेत, असेही रामराजे यांनी या वेळी सांगितले.

आमदार आणि मी एकटाच उरलो!

सध्या विकासाच्या दृष्टीने मला कोणी भेटत नाही. मला स्वतःला काहीच मिळवायचं नाही. कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. सध्या तरी माजी आमदार आणि मी एवढेच राहिलो आहोत. – रामराजे नाईक निंबाळकर