सांगली : सांगली जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीच्या सर्वांगीण विकासासाठी नमामि कृष्णा योजना राबवावी, या संकल्पनेतून केंद्र सरकारने एकात्मिक नदी विकास प्रकल्प हाती घ्यावा, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे. दिल्ली येथे केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांची आमदार गाडगीळ यांनी भेट घेतली. त्यांना नमामि कृष्णा योजना राबविण्याबाबत निवेदन देत चर्चाही केली.

आमदार गाडगीळ यांनी चर्चा करताना सांगितले, कृष्णा नदी ही या भागाच्या जलस्रोत, जैवविविधता, कृषी, धार्मिक आणि पर्यटनस्थळांची आधारभूत व्यवस्था आहे. मात्र, सध्या नदीच्या काठावर प्रदूषण, अतिक्रमण, सांडपाणी विसर्जन आणि एकूणच अनागोंदी या सर्वांमुळे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नमामि गंगे व साबरमती रिव्हर फ्रंट या यशस्वी प्रकल्पांच्या धर्तीवर, सांगली जिल्ह्यातही नमामि कृष्णा संकल्पना राबवावी. एकात्मिक नदी विकास आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या नमामि गंगे योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात व्यापक उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच गुजरातमधील साबरमती नदीच्या काठावर विकसित रिव्हर फ्रंट प्रकल्पामुळे पर्यावरण, पर्यटन आणि नागरी सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडून आले आहेत. त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यातही कृष्णा नदीच्या काठावर एकात्मिक विकास प्रकल्प राबविणे आवश्यक, योग्य व समयोचित ठरेल. या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेऊन नमामि कृष्णा प्रकल्पास मंजुरी द्यावी, असे आमदार गाडगीळ यांनी सांगितले.

दरम्यान, पावसाचा हंगाम आणि कोयनेतून करण्यात आलेल्या विसर्गाचा फायदा घेत कृष्णाकाठावरील औद्योगिक कारखान्यातून दुषित पाण्याचा निचरा कृष्णा नदीच्या पात्रात गेल्या आठवड्यात करण्यात आला होता. यामुळे नदीतील माशांचा मृत्यूही झाला. याबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

दुषित पाण्याबाबत प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. सांगली महापालिकेकडूनही सांडपाणी नदीपात्रात शेरीनाल्याच्या माध्यमातून नदीपात्रात सोडण्यात येते. यामुळे सांगलीकरांसह नदीकाठच्या गावांना दुषित पाण्यामुळे आजारांचा सामना करावा लागत असून नदीतील जलचर प्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.