विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अखेर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसनंतर राष्ट्रवादीनं आपल्या उमेदवाराची नावं जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली. त्याचबरोबर दोन्ही उमेवादारांच्या विजयाबद्दल विश्वासही व्यक्त केला.

करोनाच्या चिंतेबरोबर राज्यात राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. निमित्त आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचं. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत असून, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. “शशिकांत शिंदे (सातारा) व अमोल मिटकरी (अकोला) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे,” असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यात्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानं त्यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यपालांकडून त्यास नकार आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडं निवडणूक घेण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगानं मागणी मंजूर करत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.