मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोनल उभारले. त्यासाठी मुंबईपर्यंत मोर्चाही काढला. मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढल्यानंतर विजयोत्सव साजरा करत मराठा आंदोलक परत आपापल्या गावी गेले. मात्र त्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. १० फेब्रुवारी पासून ते उपोषण करणार आहेत. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरे यांनी जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण याबाबत रोखठोक भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजयोत्सवानंतर पुन्हा उपोषणाची वेळ का आली?

“नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि मराठा मोर्चेकरी विजयोत्सव साजरा करू लागले. पण विजय काय मिळाला, हे तर लोकांना कळले पाहीजे. जे सामान्य मराठा बांधव, भगिनी मुंबईत आले होते, त्यांना तरी काय निर्णय झाला, हे कळलं का? जर तेव्हा आनंद व्यक्त केला होता, तर आता परत उपोषणाची वेळ का आली?”, असे सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

‘यावेळी पंतप्रधान कोण व्हावा?’, मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले…

तसेच मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, तेव्हा आंदोलकांसमोरच मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती, असे सांगताना राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, “जरांगे पाटील यांची मागणी झटक्यात पूर्ण होणार नाही. हा तांत्रिक आणि कायद्याचा मुद्दा आहे. अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही आणि केंद्र सरकारला यावर निर्णय घ्यायचा असेल तर सर्व राज्यांचे मत जाणून घ्यावे लागेल. कारण प्रत्येक राज्यात ही परिस्थिती आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागेल. विशेष अधिवेशन बोलवावे लागेल.”

जरांगे पाटील फसले की फसवले गेले?

मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा उपोषण करावे लागत असल्यामुळे ते फसले की फसवले गेले? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, मी एखादी गोष्ट बोलतो, ती सुरुवातीला कडवट वाटते. पण तिच गोष्ट सत्य असते.

‘कमरेत लाथ घालून बाहेर काढा’, संजय गायकवाडांच्या टीकेला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार करावा लागेल. मागे एकदा मराठा समाजाला तापवलं, ते सर्व मुंबईत मोठ्या संख्येने आले. आता दुसऱ्यांदा मुंबईत मोर्चा काढण्यात आला. पण वस्तूस्थिती आपण पाहणार आहोत की नाही? कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे म्हणून आपल्याला मोर्चासाठी नेले जात आहे, याचा विचार प्रत्येक समाजाने केला पाहीजे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray reaction on manoj jarange patil and political agenda of maratha reservation protest kvg
First published on: 02-02-2024 at 13:36 IST