अलिबाग : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, शालोम पेणकर, रफीक तडवी यांना खंडणीखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पेण उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पेण येथील सेतू कार्यालयात दाखले काढण्यासाठी तालुक्यातील पालक-विद्यार्थ्यांची गर्दी होत होती. हीच संधी साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मनसे पक्षातील अन्य सहकाऱ्यांसहित सेतू कार्यालया समोर स्टंटबाजी केली होती. यावेळी दबाव येण्यासाठी पेण तहसील कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलनही केले होते. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मुद्रांक विक्रेत्यांकडे वळवला होता. यावेळी फिर्यादी तथा मुद्रांक विक्रेता, माजी नगरसेवक हबीब खोत यांच्यावर दबाव येण्यासाठी पेण तहसील कार्यालय परिसरात हंगामा केला होता.

त्यानंतर आरोपी संदीप ठाकूर याने मुद्रांक विक्रेते, फिर्यादी हबीब खोत यांना फोन करायला सांगून भेटायला बोलावले. चाकूचा धाक दाखवून पहिले ३ लाख रुपये रोख व दरमहा ४०  हजार रुपये खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास राजकीय जोर लावून तुझा परवाना रद्द करण्याची व चाकूचा धाक दाखवून जिवाची बरेवाईट करण्याची धमकी दिली. होती.

ताडजोडीअंती 2 लाख रुपये रोख देण्याचा तोडगा निघाला. यानंतर ७ जुलै रोजी रात्रौ 8 च्या सुमारास आरोपी संदीप ठाकूर आपल्या अन्य साथीदारांसह पेण शहरातील मुख्य नाक्यावरील सुपर मार्केट समोर पहिला हप्ता ५० हजार रुपये स्वीकारले होते. तर दीड लाख रुपये ११ जुलैला देण्यास सांगितले होते.

याबाबतची तक्रार प्राप्त होताच, पेणचे नवनिर्वाचित उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी सापळा रचून संदीप ठाकूर आणि त्याचा सहकाऱ्यांना ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २०९/२०२३ ची नोंद करण्यात आली असून भादंवि कलम ३६७, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.