मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे, दरम्यान राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जाहीर आव्हान दिलं आहे. प्रबोधनकारांची पुस्तकं वाचली तर जात-पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील असा सल्लाही दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटच्या करत तसंच पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. “राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन,” असं जाहीर आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिलं. “मुंब्र्यात काही शतकं हिंदू-मुसलमान प्रेमाने राहतात. मुंब्र्याला बदनाम करू नका,” असं ही यावेळी आव्हाड म्हणाले.

मनसेची प्रतिक्रिया –

मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी ट्वीट करत आव्हाडांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “‘डॉक्टर’ जितेंद्र आव्हाड यांना असं वाटतं की, प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. ‘उठ मऱ्हाठ्या उठ’ या प्रबोधनकार ठाकरे लिखित पुस्तकातील ‘स्वाभिमानाची लागवड’ हे पहिलं प्रकरण ‘डॉक्टर’ आव्हाड यांनी आवर्जून वाचावं, मगच राजसाहेबांवर टीका करण्याचं धाडस करावं”.

यावेळी त्यांनी ट्वीटसोबत पुस्तकातील परिच्छेदाचा फोटोही शेअर केला आहे.

आव्हाड काय म्हणाले आहेत?

“राज ठाकरे यांना मुंब्र्यातील एकाही मशिदीत साधा वस्तरा जरी सापडला तरी आपण राजकारण सोडू,” असं जाहीर आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. एकीकडे शरद पवार सर्व जाती-धर्माच्या लोकांना घेऊन एकत्र चालतात तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या घराबाहेर मागासवर्गीय समाजातील तरुणांना बेदम मारहाण होते यातच जनतेने काय ते समजून घ्यावे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

“पाच वर्षांपूर्वी राज्याच्या प्रगतीची ब्ल्यू प्रिंट सादर करणारे राज ठाकरे आज तरुणांना मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचा सल्ला देतात. याला मानसिक अधोगती म्हणायचं का?,” असा सवाल त्यांनी केला. “ज्या घरात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली त्याच घरात राज ठाकरे जातीपातीचे राजकारण करत असून महाराष्ट्राला जाळून टाकण्याचा प्रयत्न करु नका,” असंही ते म्हणाले.

“निष्कारण जाती पातीत, धर्मांमध्ये राजकारण करत आग लावायची आणि महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा जो कट आखला आहे त्याचे हे सूत्रधार आहेत. काही जणांना सूत्रं हातात घ्यायची नाही आहेत. पुढे करण्यासाठी कोणीतरी लागतं,” असंही ते म्हणाले.

“टाळ्या मिळवण्यासाटी असं वक्तव्य करणं ठीक आहे पण आपल्या वक्तव्याचे महाराष्ट्रात काय पडसात उमतील त्याचा जरा तरी विचार करा,” असा सल्लाही त्यांनी दिला.

“पाच वर्षांपूर्वी राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करत होते. विकासाचे मॉडेल दाखवत तरुणांना रोजगार देतो बोलणारे राज ठाकरे आज त्या पोरांना मशिदींबाहेर भोंगे लावयला सांगत आहेत. ही विचारांची प्रगती आहे की अधोगती हे त्यांनी ठरवावं,” असंही ते म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही. दंगल कशाला म्हणतात हे त्यांना माहिती नसावं. अजोबांची चार पाच पुस्तकं वाचली तर जात पात काय आणि त्याचे जन्मदाते काय आहेत हे समजेल. एकीकडे शरद पवार सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन एकत्र चालतात तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या घराबाहेर मागासवर्गीय समाजातील तरुणांना बेदम मारहाण होते यातच जनतेने काय ते समजून घ्यावे. तुमचं प्रेम, डोक्यातील घृणा आजपर्यंत विशिष्ट कृतीतून कायम दिसली आहे. तुमची मानसिकता उशिरा कळली पण जाहीर झाली आहे,” अशी टीका यावेळी आव्हाडांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार यांच्यावर बोलल्यानेच आपल्याला प्रसिद्धी मिळते हे जाणून राज ठाकरे पवारांवर टीका करतात असा टोला त्यांनी लगावला. “राज ठाकरे महाराषट्राचे एकच नेते आहेत जे दर पाच वर्षांनी आपले रंग बदलतात. सरड्यापेक्षा जलदगतीने रंग राज ठाकरे बदलतात त्यामुळे त्यांचं भाषण गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोक सुट्टी असली आणि एखादा छान वक्ता असली की जातात. प्रल्हाद केशव अत्रेंच्या सभेला लाखो लोक जायचे, पण ते कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत. भाषणाला लोकं आली म्हणजे तो फार आवडता. लोकप्रिय, मास लिडर असं काही होत नाही. लोकांमध्ये, शेवटच्या घटकापर्यंत जावं लागतं. आपली जात विसरावी लागते. शेवटच्या माणसालाही आपला वाटावा असं वातावरण निर्माण करावं लागतं. तुम्हाला तर ६ डिसेंबरला घराबाहेरु जाणाऱ्यांबद्दल काय वाटतं हे तुम्ही बोलून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे हे सर्वांना माहिती आहे,” असंही आव्हाड म्हणाले.