अकोले: मुळा-भंडारदरा धरणांचे पाणलोट क्षेत्रात दीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सून दाखल झाला. आज, सोमवारी सकाळपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
कोकण किनारपट्टीसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असला तरी कोकणचा शेजार लाभलेल्या अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस नव्हता. जूनच्या पूर्वार्धात धरणांचे पाणलोट क्षेत्रात जेमतेम पाऊस पडला. पंधरा जूनपर्यंत घाटघर येथे अवघा २०० मि. मी. पाऊस पडला तर भंडारदरा येथे फक्त ७० मि. मी. पावसाची नोंद झाली होती.
आज सकाळपासून मात्र तालुक्यात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात मोसमी पावसास सुरवात झाली आहे. मुळा- भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. झाकोळलेले आकाश, अंतरा अंतराने येणाऱ्या पावसाच्या सरी, हवेत निर्माण झालेला गारठा, धुक्यात हरवणारी पर्वत शिखरे हे वैशिष्ट्यपूर्ण पावसाळी वातावरण पश्चिम भागात निर्माण झाले आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातही पावसाळी वातावरण निर्माण झाले असून पावसाच्या हलक्या सरी मधून मधून येताहेत. भंडारदरा धरणात सध्या २२.१५ टक्के म्हणजे २ हजार ४४५ दलघफू. पाणी शिल्लक आहे तर निळवंडे धरणात २ हजार ५८७ दलघफू (३१.०६ टक्के) पाणीसाठा आहे. घाटघर येथे आज सकाळी ५४ मि. मी. पावसाची नोंद झाली.