लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
अलिबाग- महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यटन विकास योजनांवरील कामांना स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती ८ सप्टेंबरच्या शासन आदेशानुसार उठविण्यात आली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील पावणे दोनशे कोटी रूपयांची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रादेशिक पर्यटन विकास योजने आंतर्गत जिल्ह्यात अनेक कामे मंजूर करण्यात आली होती. पण राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही कामे गेल्या दिड वर्षांपासून रखडली होती. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानंतर आता ही स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबतचे आदेश जारी केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-Ganesh Chaturthi 2023: गणेशभक्तांपुढे प्रवासविघ्न; मुंबई-गोवा महामार्गावर अडथळय़ांची शर्यत कायम
या योजने आंतर्गत रायगड जिल्ह्यात जवळपास पावणे दोनशे कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यात किहीम येथे सलीम अली पक्षी अभ्यास केंद्र, दिवेआगर येथील कासव संशोधन प्रकल्प, देवकूंड धबधबा परिसर विकास, रोहा येथे शिवसृष्टी प्रकल्पाची उभारणी, पोलादपूर येथे घागरकोंड येथे झुलत्या पुलाचे बांधकाम, सुर्याजी मालुसरे समाधी स्थळ विकास, हरिहरेश्वर येथे सभामंडप आणि सेल्फी पॉईँटची निर्मिती, शिवथरघळ, उंबरखिंड येथील विकास, अलिबाग कान्होजी आंग्रे समाधीस्थळ परिसर विकास, वरसोली आणि कुरूळ येथील मंदीर विकास रोहा हनुमान मंदीर परिसर विकास, श्रीवर्धन येथील धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे नुतनीकरण, पेण गागोदे येथील विकास कामांचा यात समावेश असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या कामांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-निम्म्या राज्यावर संकट; राज्यातील ३५५ पैकी १९३ तालुके अवर्षणग्रस्त
सागरी मार्ग किनाऱ्यावरूनच नेणार
बहुप्रतिक्षीत सागरी महामार्गाचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पण एमएसआरडीसीने तयार केलेल्या आराखड्यात तयार केला असून भूसंपादन नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. पण एमएसआरडीसीने मुळ रस्त्याच्या मार्गात बदल केले आहेत. हा मार्ग किनाऱ्यावरून नेण्याऐवजी तो आतील भागातून नेला जाणार आहे. मात्र पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सागरी मार्गाची निर्मिती होणार असल्याने हा मार्ग समुद्र किनाऱ्या लगतच्या परीसरातूनच जावा असा आमचा आग्रह आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार असल्याचेही तटकरे म्हणाले. अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही लवकरच मार्गी लागेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.