सोलापूर शहराच्या तुलनेत जिल्हा ग्रामीणमध्ये वाढलेला करोनाचा कहर आटोक्यात येण्याची तूर्तास तरी काही चिन्हे दिसत नाहीत. शुक्रवारी जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाने १३ बळी घेतले. तर नवीन ३४० बाधित रूग्ण आढळून आले. तर शहरात दोन रूग्ण दगावले आणि ७० नवीन रूग्ण सापडले. तथापि, शहरात सध्या केवळ नऊ टक्के एवढेच रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.

शुक्रवारी शहरात १ हजार २५७ चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ७० बाधित रूग्ण सापडले. त्यामुळे एकूण ६७ हजार ५१३ चाचण्यांमधून आढळून आलेली रूग्णसंख्या ६ हजार ८८५ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा ४२५ झाला आहे. दुसरीकडे ५ हजार ८४१ रूग्ण करोनामुक्त झाले असून सध्या जेमतेम ६१९ एवढेच रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मृत्युचे प्रमाण अद्याप ६.१७ टक्के आहे. एकूण चाचण्यांच्या तुलनेत आढळून आलेल्या बाधित रूग्णांचे प्रमाण १०.१९ टक्के आहे.

शहराच्या तुलनेत जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून यात बळींची संख्याही वाढत आहे. शुक्रवारी २ हजार ९३७ चाचण्या घेण्यात आल्या असता त्यात ३४० बाधित रूग्णांची नोंद झाली. तर १३ रूग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधित रूग्णसंख्या १२ हजार ८४९ झाली आहे. तर मृतांचा आकडाही ३७३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ८९९१ रूग्ण करोनामुक्त (७० टक्के) झाले आहेत. सध्या २७.१२ टक्के अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. मृत्युचे प्रमाण २.९० टक्के झाले आहे.

शुक्रवारी नव्याने सापडलेल्या बाधित रूग्णांमध्ये माढा तालुक्यात ७० रूग्णांचा समावेश आहे. तसेच तीन रूग्ण मृत्युमुखी पडले. बार्शीत ६८ रूग्ण सापडले असता दोन रूग्ण दगावले. माळशिरसमध्ये ३४ रूग्ण सापडले आणि दोन मृत झाले आहेत. पंढरपूर येथे ५२ रूग्णांची भर पडली असून एका रूग्णाचा मृत्यू झाला. शहर व जिल्ह्यात मिळून एकूण बाधित रूग्णसंख्या १९ हजार ७३४ वर पोहोचली असली तरी १४ हजार ८३२ रूग्ण करोनामुक्त (७५ टक्के) झाले आहेत. मृत्युचे प्रमाण ३.७९ टक्के असून एकूण चाचण्यांच्या तुलनेने आढळून आलेल्या बाधित रूग्णांचे प्रमाण ११.३३ टक्क्यांवर राहिले आहे.