मुंबई, पुणे नाशिक : ऑगस्ट महिन्याचे सलग दोन आठवडे शनिवार-रविवारला जोडून दोन सुट्टय़ा आल्यामुळे या विकान्तीच्या जोडमौजेसाठी नजीक आणि दूरच्या पर्यटनस्थळांना भटकबहाद्दरांनी पसंती दिली आहे. बस, ट्रेन आणि विमान आरक्षणासह रिसॉर्ट आणि क्लब्जमधील नोंदणी ८० टक्क्यांहून अधिक झाली असून त्यामुळे पर्यटन उद्योगाचे करोनामुळे अडलेले गाडे जोराने धावण्याची चिन्हे आहेत.

थंड हवेच्या ठिकाणी, धरण आणि धबधब्यांच्या ठिकाणांसह कोकण, गोवा येथे जाण्यासाठी मुंबईकर पसंती दर्शवत आहेत.  पावसाचा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणी जाण्याचे नियोजन मुंबईकरांकडून केले जात आहे.  लोणावळा, माथेरान, माळशेज घाट, महाबळेश्वर आणि मुरबाड, शहापूर, कर्जत, भिवपुरी या जागांना सर्वाधिक पसंती दिसत आहे.

पुणे विभागांतर्गत महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला, भीमाशंकर, कोयनानगर, सिंहगड आणि अक्कलकोट अशी नऊ निवासस्थाने आहेत. त्यापैकी सिंहगड आणि अक्कलकोट ही दोन निवासस्थाने अद्याप सुरू झालेली नाहीत. मात्र, उर्वरित सातही निवासस्थाने ८० टक्के आरक्षित झाली असून येत्या तीन दिवसांत पूर्ण क्षमतेने निवासस्थाने आरक्षित होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांकडे डोंगर-दऱ्या, जंगल, खळाळणाऱ्या नद्या, ओढे, धबधबे यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अधिक संख्येने येतात. त्र्यंबकजवळील पहिने बारी, अंजनेरी, दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला, ब्रम्हगिरी, तोरंगण, इगतपुरी तालुक्यातील वैतरणा, भावली ही धरणे, कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गड परिसर येथे मुंबई-पुण्यातून मोठी गर्दी होते. श्रावणातील सोमवारी ब्रम्हगिरीला भाविकांकडून प्रदक्षिणा घातली जाते. तिसऱ्या श्रावणी सोमवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी असल्याने भाविकांच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

हौसेचे चित्र.. लोणावळा आणि खंडाळय़ात पर्यटकांची यंदा सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. येथील हॉटेल आणि खासगी बंगलेही आरक्षित केले जात आहेत. केरळ, तमिळनाडू, लेह, केदारनाथ, वैष्णोदेवी येथे जाण्यासाठी देखील ग्राहकांकडून आरक्षण केले जात आहे, अशी माहिती खासगी पर्यटन कंपनीमधील कर्मचाऱ्याने दिली.

खबरदारी म्हणून..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्गावर कोंडी होण्याची भीती असल्याने लोणावळा शहर पोलीस ठाण्याकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. शहरातून जाणारा मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व पर्यटनस्थळांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना हरिहर किल्ला, दुगारवाडी धबधबा या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे.