नांदेड : खासगी शिकवणीवर्ग आणि वैद्यकीय-अभियांत्रिकी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी नांदेडमध्ये शिकणारे शेकडो विद्यार्थी व्यसनाधीन होत असून, शहराच्या मध्यवर्ती भागातील दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. ती थांबविण्याची, तसेच विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी केली.

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनामध्ये समितीची बैठक झाली. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश आमदार बैठकीस हजर होते.

नांदेडमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने राज्यातील, तसेच अन्य प्रांतांतील विद्यार्थी वास्तव्यास असून, त्यांच्यातील अनेकजण तंबाखू व धूम्रपान या व्यसनांच्या पुढच्या पायरीवर गेले असल्याची चर्चा वेगवेगळ्या माध्यमांतून होत आहे. शहराच्या उत्तर भागातील निवासी वस्त्यांमध्येच वेगवेगळे क्लास आणि तयारी वर्ग फोफावले असून, त्यामुळे अनेक वसाहत्यांमध्ये गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अमली पदार्थांच्या विक्रीचा आणि त्यावर संंबंधित यंत्रणांचे नियंत्रण नसल्याचे मुद्दे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निघाल्यानंतर पालकमंत्री सावे यांनी तत्काळ कारवाई करण्याची सूचना संंबंधित विभागांना दिली.

काही आठवड्यांपासून नांदेड शहर आणि जिल्ह्यातील महावितरणच्या कारभाराविरुद्ध मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत आहेत. विद्युत पुरवठ्यातील विस्कळीतपणा ही बाब नित्याचीच बनली आहे. बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागांतील समस्या मांडल्या. लोहा-कंधार भागातील आमदाराच्या गावातच अनेक दिवस विद्युतपुरवठा खंडित होता. या सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबईमध्ये स्वतंत्र बैठक घेण्याचे जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भाजपचे राज्यसभा सदस्य गुरुवारी सायंकाळीच शहरामध्ये दाखल झाले. शुक्रवारी सकाळी त्यांनी पालकमंत्र्यांची भेटही घेतली. बैठकीमध्ये ते खासदार अशोक चव्हाण यांच्या शेजारीच स्थानापन्न झाले होते. बैठकीतील चर्चेदरम्यान जिल्ह्यातील सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांचे केवळ भोकर मतदारसंघाकडे जास्त लक्ष असल्याचा टोला त्यांनी लगावला.