उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी ५ वाजता मालेगावला पोहचतील. शिवसेनेचे प्रमुख नेते त्यांच्यासोबत असतील. सभा मालेगावात असली, उत्तर महाराष्ट्रात असली तरीही सभा महाराष्ट्राची आहे असं मी मानतो असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कालपासून देशात आणि राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या पाहता देशात लोकशाहीच राहिलेली नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना आज खुलं आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचे पाच आमदार तरी निवडून आणून दाखवावेत असंही राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले आहेत? जे आपल्या विरोधात आवाज उठवतील त्यांना न्यायालय, तपासयंत्रणांकडून नष्ट करायचं. विरोधक नष्ट करायचे हेच चाललं आहे. एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले की आम्हाला खोके, मिंधे का म्हणता? हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे. हिंमत असेल तर आणि तुम्ही सच्चे असाल किंवा जे काही बंड वगैरे केलंय म्हणत असाल ते खरं असेल तर राजीनामे द्या. आत्ता निवडणुका घ्या तेव्हा जनताच दाखवून देईल की खरी शिवसेना कोणती आणि तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा असं आव्हानच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. राहुल गांधी मोदींपुढे झुकले नाहीत राहुल गांधी हे झुकले नाहीत. आम्हीही झुकलो नाही, गुडघे टेकले नाहीत. राहुल गांधी यांनी माफी मागितली असती तर त्यांची खासदारकी गेली नसती. पण राहुल गांधींनी कारवाई होऊ दिली. राहुल गांधी यांनी हे पाऊल उचलणं म्हणजे हुकूमशाहीच्या विरोधात घेतलेली भूमिका आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.राहुल गांधी यांना धडा शिकवायचा, त्यांना संसदेत बोलू द्यायचं नाही म्हणून हा घाईने घेतला निर्णय. कारण अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये शिक्षा होत नाही. माझ्यावर अशा प्रकारच्या सतरा केसेस आहेत. राहुल गांधी यांना जाणीवपूर्णक त्रास दिला जातो आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेना चोरली एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चोरली आहे. त्यांनी स्वतः पक्ष स्थापन करून त्याचे पाच आमदार निवडून दाखवा. एकनाथ शिंदे, राज ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर टीका केल्या शिवाय शांत बसू शकत नाहीत त्यामुळेच उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व किती मोठं आहे हे समजतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाशी सौदा करून एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्ह मिळवलं असाही आरोप संजय राऊत यांनी केला.