धर्मवीर आनंद दिघे यांनी धुळवडीचा महोत्सव सुरु केला आहे. तो दरवर्षी साजरा होतो. यावर्षीही आम्ही उत्साहात हा सण साजरा करतो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यात सहभागी होणार आहेत अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. तसंच धुळवडही ते खेळले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना आणि ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

आज धुळवडीच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज सगळेजण वेगवेगळ्या रंगात रंगले आहेत. एका रंगात भारत रंगला आहे तो म्हणजे भगवा रंग. भगव्या रंगात लोक रंगून गेले आहेत. धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा. रुसवे-फुगवे बाजूला ठेवण्याचा आजचा दिवस. एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारे खेळली पाहिजे. विरोधक सत्ताधारीही या दिवशी एकत्र येतात. कटुता दूर करणारा हा सण आहे. काही लोकांनी भगवा रंग सोडला आहे. ज्यांनी भगवा रंग सोडून जो रंग धारण केला आहे तो त्यांना लखलाभ असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरेंचा भगवा रंग, हिंदुत्वाचा भगवा रंग, प्रभू रामाचा भगवा रंग पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहोत. असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “ओमर अब्दुल्लांना जाब विचारण्याची हिंमत तरी ठेवा”, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना’त्या’ विधानावरून टोला!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यातल्या टेंबी नाका भागात जाऊन होळीचा आनंद लुटला. त्यांनी धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धुळवडीचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस राजकारण करण्याचा दिवस नाही. महाराष्ट्राच्या जनतेला धुळवडीच्या शुभेच्छा देत आहोत. राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य आणि केंद्र सरकार मिळून महाराष्ट्राचा विकास करतो आहोत. रासायनिक रंगांचा वापर करुन होळी खेळू नका असंही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं.