वाई: महायुतीचे उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले बुधवारी सातारला येत आहेत. निवडणूक लढविण्याचे ठरवूनच ते साताऱ्यात येत असल्याने भाजपाचे उमेदवार म्हणून त्यांच्या जंगी स्वागताची जोरदार तयारी समर्थकांनी केली आहे. येथूनच उदयनराजे यांच्या मोठ्या मिरवणुकीने प्रचाराचा आरंभ करण्यात येणार आहे.गावोगावचे ग्रामस्थ त्यांचे स्वागत करणार आहेत.सातारा जिल्ह्याच्या सीमेवर पुणे बंगळूर महामार्गावर नीरा नदी ओलांडून येताच शिंदेवाडी (ता खंडाळा)त्यांचे मोठे स्वागत करण्यात येणार आहे.  तेथून साताऱ्यापर्यंत त्यांची  मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे.२५ जेसीबींतून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

भाजपाचे उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले  साताऱ्यात येत आहेत. त्यांनाच उमेदवारी मिळाल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. दिल्लीतील मुक्काम  संपवून ते उद्या (बुधवारी) साताऱ्यात  येत असून, त्यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणीं महामार्गावर पोस्टर्स, हारतुरे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह इतर थोर नेत्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे.

हेही वाचा >>>“आमच्यावर अविश्वास दाखवलात तर…”, पक्षप्रवेशावेळी मोहिते पाटलांचा शिवाजीराव आढळरावांना इशारा

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत खासदार उदयनराजे यांची उमेदवारी निश्चित केलेली असून महायुतीचे व भाजपाची उमेदवारी त्यांनाच  मिळाल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.त्यामुळे त्यांच्या स्वागताची त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे.शिरवळपासून साताऱ्यापर्यंत जागोजागी उदयनराजेंच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळे थेट दिल्लीतून साताऱ्यातही कार्यकर्त्यांना संदेश गेल्याची चर्चा आहे.

शिरवळ येथील नीरा नदी पूल येथे साताऱ्याच्या  सीमेवर उदयनराजे  दुपारी तीन वाजता येणार आहेत. त्यानंतर शिरवळ   खंडाळा  वेळे, सुरूर  कवठे येथील किसन वीर पुतळा , भुईंज, पाचवड फाटा,  लिंब , वाढे फाटा, बाँबे रेस्टॉरंट चौक, विसावा नाका, पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.

हेही वाचा >>>सांगली लोकसभा उमेदवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष दिल्लीच्या निर्णयाकडे

यानंतर  गोलबागेतील थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जलमंदिर येथे दाखल होणार आहेत, अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली . साताऱ्यात आल्यानंतर उदयनराजे यांच्यावर २५ जेसीबींमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर दोन क्रेनच्या मदतीने भलेमोठे दोन हार घालून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. माढा चे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फडणवीस यांची भेट घेऊन बाहेर पडले. तेव्हा माध्यमांना त्यांनीही उदयनराजे यांना उमेदवारी मिळाल्याची माहिती दिली. सातारा राष्ट्रवादीकडे होते. त्यांनी साताऱ्याची जागा सोडलेली नाही. मात्र उदयनराजेंच्या उमेदवारीं बाबत आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि २८ रोजी याबाबत योग्य ती माहिती दिली जाईल असे सांगितले . भाजपाचे नेते उदयनराजेंशी बोलतील असे सांगितल्याने साताऱ्याच्या जागेचा तिढा कायम असल्याचे दिसते. मात्र तरीही साताऱ्यात उदयनराजेंच्या स्वागताची व प्रचाराच्या शुभारंभाची जोरदार तयारी केली आहे. काहीही झाले तरी उदयनराजे निवडणूक लढविणारच असे समर्थक सांगत ठामपणे आहेत .