कोल्हापूर : तब्बल चार दशकाचे प्रयत्न सार्थकी लागले आणि सोमवारपासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्याने या परिसरात वकील, पक्षकार, विद्यार्थी यांची लगबग वाढली होती. एकंदरीतहे सारे समाधानकारक चित्र पाहून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकिल, नागरिकांनी याचसाठी केला होता अट्टाहास अशा भावना भावना व्यक्त केल्या.
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सर्किट बेंचचे लोकार्पण झाल्यानंतर आज लगेचच कामकाजाला सुरुवात झाली. कोल्हापूरच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना ठरली.
आज न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या पिठासमोर ७९ , न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकल पीठा समोर ७४ व न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांच्या एकलखंडे एकल पीठ समोर १४७ प्रकरणे सूचीबद्ध झाली होती.
छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयासमोरील या ऐतिहासिक इमारतीत आज कामकाज सुरू झाले. तेव्हा या भागातील नेहमीची वर्दळ काहीच थांबली होती. न्यायालयीन शिस्तीचा वेगळा अनुभव आज येत राहिला. सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकार यांची पावसाची संततदार सुरू असतानाही या भागात लगबग दिसून आली.
कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, कराड येथे विधी शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आज सर्किट बेंचच्या कामकाजाची पाहणी करून एक वेगळा अनुभव घेतला. न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने कोल्हापूरकरांनीही येथे हजेरी लावली.
राज्यपालांकरवी १२ आमदारांच्या निवडीला ठाकरेसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबतचे २८ ऑगस्टला काम चालणार होते ते कोल्हापूर मध्ये वर्ग होण्याकरिता ते आज येथे आले होते. पंचगंगा नदी प्रदूषणापासून ते कचरा गैरव्यवहारबाबतच्या जनहित याचिका दाखल करणारे प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे दिलीप देसाई यांनीही सर्किट बेंच सुरू झाल्याने पक्षकारांना लवकर न्याय मिळेल अशी भावना व्यक्त केली.
सीपीआर समोर असणारी जिल्हा न्यायालयाची इमारत सन १८७४ मध्ये बांधण्यात आली. जिल्हा न्यायालयाचा परिसर साधारण ४२०० चौरस फूट क्षेत्र आहे. कसबा बावडा येथील जागेत जिल्हा न्यायालयाची नवी इमारत स्थलांतरीत झाल्यामुळे ही इमारत बंद होती, परंतू काही इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालयाचे काम करण्यात येत होते. या मूळ इमारतीचे अत्यंत कमी वेळेत नूतनीकरण करुन याच इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज होत आहे. न्यायदानाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज इमारतींना सर्किट बेंचमुळे नवी झळाळी मिळाली आहे.