सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या मिळवता येणार आहेत. विशेषतः व्यस्त जीवनशैली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे एक मोठे वरदान ठरणार आहे, जेणेकरून त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही. या उपक्रमासाठी विद्यापीठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांसोबत करार केला असून, त्यात सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा अग्रक्रमाने समावेश आहे.
याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांनी सोमवारी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. अनिल बनकर, प्रा. दिलीप भारमल, प्रा. मंदार भानुसे, डॉ. लीलाधर बन्सोडे, आणि प्रा. सुभाष वेलिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी पुढाकार
डॉ. सरगर यांनी सांगितले की, “धकाधकीच्या जीवनात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून आणि त्यापुढे पदवीपासून वंचित राहू नये यासाठी मुंबई विद्यापीठाच्या टीमने हा पुढाकार घेतला आहे.” १२ वी नंतर किंवा पदवीनंतर हे शिक्षण घेता येणार आहे. यामध्ये एम.कॉम आणि एम.एस्सी. सारख्या तब्बल २८ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या वर्षापासून हे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
दोन पदव्यांसाठी नियम आणि ऑनलाइन शिक्षणाची सोय
या योजनेअंतर्गत विद्यार्थी एकाच वेळी दोन पदव्यांसाठी प्रवेश घेऊ शकणार आहेत. यामध्ये एका पदवीसाठी ७५ टक्के उपस्थिती आवश्यक आहे, तर दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी उपस्थितीची अट नाही. संबंधित विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनेही शिक्षण घेऊ शकतो. हे अभ्यासक्रम थेट मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून चालवले जाणार असल्याने विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. या पदव्या नियमित अभ्यासक्रमांच्या आणि पारंपरिक पदवीच्या समकक्ष मानल्या जातील.
कोकणात सात केंद्रांवर पदवी घेण्याची सुविधा
डॉ. सरगर यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थी राज्यातील कोणत्याही केंद्रातून ही पदवी प्राप्त करू शकतो. कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, ज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कोकणात पहिल्यांदाच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाला या कराराचा मान मिळाला आहे. युवराज लखमराजे भोसले यांनी हा करार स्वीकारला. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले आणि विविध महाविद्यालयांतील मान्यवर उपस्थित होते.
विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध:
या नव्या उपक्रमांतर्गत अनेक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असतील:
पदवी स्तरावरील अभ्यासक्रम:
बीए: इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी, आणि इंग्रजी.
बीकॉम: कॉमर्स, अकाउंटन्सी, आणि बिझनेस मॅनेजमेंट.बीकॉम: अकाउंट अँड फायनान्स. बीएस्सी: माहिती तंत्रज्ञान.
बीएस्सी: संगणकशास्त्र.या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केले जात आहेत.
पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम: एम.ए.: इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क.एम.कॉम.: ऍडव्हान्स अकाउंटन्सी. एम.कॉम.: बिझनेस मॅनेजमेंट. एम.एस्सी.: गणित, माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र. एमएमएस, एमसीए.
याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट (PGDFM) या अभ्यासक्रमाचाही समावेश आहे.या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवले जात आहेत.
एम.ए. समाजशास्त्र आता ऑनलाईन
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पहिल्यांदाच या शैक्षणिक वर्षापासून एम.ए. समाजशास्त्र हा अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरु केला जात आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाईल. कोणताही पात्रताधारक विद्यार्थी कुठूनही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन विद्यार्थी सहायता केंद्रे (LSC)आज करार करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील महाविद्यालयांचा समावेश आहे:
पुंडलिक अंबाजी कारले महाविद्यालय, शिरगाव डॉ. बाबासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला, श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग एसकेपीएस वाणिज्य आणि डीएसजी विज्ञान महाविद्यालय, मालवण, आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग, कणकवली महाविद्यालय, कणकवली, कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट यांचा समावेश आहे. या अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसराला भेट देता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे विश्वस्त लखम सावंत भोसले, भोसले नाॅलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले तसेच मान्यवर प्राचार्य उपस्थित होते.