Kirit Somaiya : गेल्या काही महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. एवढंच नाही तर मनसेकडून मशिदीवरील अनधिकृत भोंग्यावरून विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे देखील काढण्यात आले होते. यावरून चांगलंच राजकारण तापल्याचंही पाहायला मिळालं होतं. दरम्यान, यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात एक मोठा दावा केला आहे. आता पुढील एका महिन्यात मुंबई आणि त्यानंतर पुढच्या तीन महिन्यांत महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचं किरीट सोमय्या आंनी आज (२३ मे) माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
“आज एका महत्वाच्या विषयावरील निवदेन पोलीस अधीक्षकांना दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या पोलीस महासंचालकांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः ५० पोलीस ठाण्यात जाऊन आलो आहे. मुंबईमध्ये एका महिन्यात सर्व मशिदीवरील भोंगे खाली येतील. तसेच पुढच्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्र भोंगे आणि लाऊडस्पीकर मुक्त होईल”, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
किरीट सोमय्या पुढे असंही म्हणाले की, “मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचं पालन नक्की होईल. मात्र, काही माफिया धर्माच्या नावावर मशिदीवर दिवसांतून ५ वेळा भोंगे वाजवत होते. भोंगे वाजवण्याची परवानगी कोणालाही नाही. लाऊडस्पीकर लाऊ शकतात, पण त्याचा आवाज फक्त जे प्रार्थना करण्यासाठी आले आहेत त्यांच्यासाठी असतो”, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्रात अनधिकृत मशिदींवर अनधिकृत भोंगे म्हणजे एक प्रकारची दहशत आणि दादागिरीचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण आता अनधिकृत भोंगे खाली घेण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. याबाबत आज पोलीस अधीक्षकांना मी निवदेन दिलं आहे. त्यामुळे एका महिन्यात मुंबई भोंगे मुक्त होईल. तसेच पुढली तीन महिन्यांत महाराष्ट्र देखील भोंगे मुक्त होईल. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलेलं आहे की कुणाचीही दादागिरी चालणार नाही”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.