सांगली : कुपवाडमधील रामकृष्णनगरमध्ये अमोल रायते (वय ३२) या तरुणाचा खून झाल्याची घटना बुधवारी पहाटे समोर आली असून, याप्रकरणी दोन संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कुपवाडमधील रामकृष्णनगरमधील स्वामी समर्थ मंदिराजवळ रस्त्यावर तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे पाच वाजता समोर आला. घटनास्थळी अज्ञातांशी मृताची झटापट झाल्याचे दिसून आले. मृताच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे घटनास्थळावरून समजले. ही माहिती मिळताच उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक मांडवलकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंंदे यांनी घटनास्थळी धाव घेत वस्तुस्थितीची पाहणी केली.

मृत अमोल रायते (वय ३२) हा स्वामी समर्थ मंदिराजवळ रामकृष्णनगरमध्ये वास्तव्यास आहे. तो मूळचा पटेल चौक सांगली येथील रहिवासी असून, तीन वर्षांपासून तो आई-वडिलांपासून विभक्त होऊन रामकृष्णनगर येथे राहण्यास आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खून प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे उपअधीक्षक गिल्डा यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार संशयिताचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, या खूनप्रकरणी दोन संशयितांना चौकशीसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाचे सत्र सुरू असून, दर चार दिवसांआड एक खुनाची घटना घडत आहे.