आगामी लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. २३ जून रोजी विरोधकांची बिहारच्या पाटणा येथे पहिली बैठक पार पडली. या बैठकीला देशातले १६ पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात १७ आणि १८ जुलै रोजी कर्नाटकच्या बंगळुरू शहरात विरोधकांची दुसरी बैठक पार पडली. यावेळी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र जमले होते. यावेळी विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ (INDIA – इंडियन नॅशनल डेव्हलपमेन्ट इन्क्लुझिव्ह अलायन्स) असं नाव देण्याचा निर्णय झाला. त्यापाठोपाठ आता इंडियाची पुढची बैठक मुंबईत होणार आहे.
इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीचं आयोजन महाविकास आघाडी करणार आहे. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि महाराष्ट्र काँग्रेस या बैठकीचं संयुक्तपणे आयोजन करणार आहे. या बैठकीच्या आयोजनासंबंधी चर्चेसाठी महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. आज वरळीतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचे नेते भेटले. ‘इंडिया’च्या आगामी बैठकीच्या आयोजनासंबंधी चर्चा पार पडल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.
यावेळी नाना पटोले यांनी जाहीर केलं की, इंडिया आघाडीची आगामी म्हणजेच तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रजी पार पडेल. महाविकास आघाडी या बैठकीचं आयोजन करत आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष ठाकरे गट, शरद पवार गट आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रत्येकी पाच नेत्यांचं एक पथक तयार करण्यात आलं आहे. हे १५ नेते बैठकीचं नियोजन करतील. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या पथकात असतील.
हे ही वाचा >> माफी मागत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही बंद; कारण काय? वाचा…
यावेळी नाना पटोले म्हणाले आमच्याबरोबर उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत. हे दोन नेते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. यांच्याबरोबर मिळून आम्ही या बैठकीचं नियोजन करत आहोत. राहुल गांधी याच्यावरील खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काल (४ ऑगस्ट) दिलेल्या निकालानंतर देशभरात आनंदाचं वातावरणं आहे. काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेदेखील या बैठकीला येणार आहेत.