नांदेड : आगामी गळीत हंगामासाठी नांदेड विभागातील सहकारी आणि खाजगी साखर कारखाने सज्ज होत असून लातूरजवळच्या ‘मांजरा’ने यंदा प्रतिटन किमान रू. ३१५० देण्याचे गुरूवारी जाहीर केल्यानंतर नांदेड जवळचा ‘भाऊराव चव्हाण’ उसाला किती दर देणार, याकडे सर्व संबंधितांचे लक्ष लागले आहे.

आपल्या यशस्वी वाटचालीची चाळीस वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘मांजरा’ची स्थापना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी केली होती तर त्यांच्यानंतरचे माजी मुख्यमंत्री चव्हाण हे ‘भाऊराव चव्हाण’चे संस्थापक आहेत. मागील दशकामध्ये या दोन कारखान्यांमध्ये उत्पादन, गुणवत्ता, विस्तार आणि शेतकरी सभासदांचा उध्दार या आघाड्यांवर निकोप स्पर्धा दिसत होती ; पण गेल्या काही वर्षात ‘मांजरा’ खूप पुढे गेला तर भाऊराव चव्हाण सर्व आघाड्यांवर मागे पडल्याचे दिसते.

नांदेड-लातूर हे जिल्हे सध्या अतिवृष्टीनंतरच्या भीषण परिस्थितीखाली असले, तरी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे कायदेशीर कर्तव्य ‘मांजरा’ने गुरूवारी पूर्ण केले. अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी समारोपाचे भाषण करताना आगामी हंगामात उसाचा प्रतिटन दर ३१५० रूपये राहील, असे जाहीर केले तर हा कारखाना सुरू झाला तेव्हा पहिल्या हंगामातील ऊस दर २७५ होता, आता आपण तीन हजाराच्या पुढे गेलो आहोत, असे आ. अमित देशमुख यांनी याच सभेत सांगितले.

‘मांजरा’ थकबाकीमध्ये नाही. उसाचा दर असो की कर्मचाऱ्यांचा पगार, एकदा जे ठरले ते पाळणारा हा कारखाना असल्याचे दिलीपरावांनी सांगितले. राज्यात काॅंग्रेसवाल्यांचे कारखाने नीट चालले असून भाजपावाल्यांकडे असलेल्या कारखान्यांत पगार वेळेवर होत नाहीत, याकडे कोणाचेही नाव न घेता त्यांनी लक्ष वेधले.

‘मांजरा’ची वार्षिक सभा शेतकरी सभासदांच्या प्रचंड उपस्थितीत झाल्यानंतर नांदेड जवळच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा शनिवारी (दि. २७) कारखानास्थळी होणार आहे. या कारखान्यामध्ये काही महिन्यांपूर्वी नेतृत्व बदल करताना खा. अशोक चव्हाण यांनी ग्रामीण पार्श्वभूमीच्या संचालकास डावलून ‘हायफाय’ संस्कृतीतील आपले पुतणे नरेन्द्र यांस अध्यक्षपदी विराजमान केले.

हा कारखानाही तिशीपार झाला आहे. मधल्या काळात हा साखर उद्योग समूह देण्यांच्या प्रचंड ओझ्याखाली दबला होता. त्यांस दोन प्रकल्प विकावे लागले. गतवर्षीच्या हंगामात दोनपैकी एका प्रकल्पामध्ये ‘एफआरपी’ची कशीबशी पूर्तता झाली. आता यंदाच्या हंगामात हा कारखाना ऊस उत्पादकांस किती भाव देणार, याकडे सभासद व ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.