नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर अंकुश मिळविल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरीही आयपीएल क्रिकेट सामन्यावर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सट्टा सुरु असल्याची माहिती आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सूचना दिल्या असल्या तरीही स्थानिक अधिका-यांनी मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.
सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरु आहेत. नांदेड जिल्ह्यात यापूर्वी क्रिकेट सामन्यावर सट्टा करणार्यांविरुद्ध अनेक वेळा कारवाई करण्यात आली. वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हेही दाखल आहेत. पूर्वी क्रिकेट सामन्यांवर सट्टा हा शहरापुरता मर्यादित होता. परंतु त्याचे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. वेगवेगळे कोडवर्ड वापरुन सुरु असलेल्या सट्टा रॅकेटची माहिती स्थानिक पोलिसांना नसावी ही गोष्ट न पटणारी आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात जालन्याचे आ. अर्जुन खोतकर यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या मदतीने सुरु असलेल्या सट्ट्याच्या व्यवहाराबाबत लक्ष वेधले होते. २९ मार्च रोजी जालना पोलिसांनी “चेन्नई सुपर – रॉयल चॅलेंजर बेंगलोर” या सामन्यावर सट्टा खेळणा-यांविरुद्ध कारवाई केली होती. यातील काही आरोपी नांदेड शहरालगतच्या हिंगोली जिल्ह्यातील आहेत. नांदेड शहरातल्या वजिराबाद, जुना मोंढा, गाडीपुरा, मालटेकडी आदी परिसरात काही जण एका सामन्यावर सट्टा चालवतात. नाणेफेक जिंकण्यापासून प्रत्येक षटकासाठी हा सट्टा चालतो. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी सट्टा चालकांनी नवीन मोबाईल अॅप तयार केले आहे. त्यावर वेगवेगळे कोडवर्ड वापरून हा व्यवहार होतो. पैसा लावल्यानंतर संबंधित व्यक्तीला आठु दिवसानंतर रक्कम दिल्या जाते.
बेटिंग अॅपवर पैश्याऐवजी पाँईट असा उल्लेख करण्यात येत आहे. समजा पोलिस कारवाई झाली तर कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी हा पर्याय निवडण्यात आला आहे. अॅपमधील अकाऊंटमध्ये जमा होणा-या पाँईटवर ती रकम देण्यात व घेण्यात येते. आयपीएल क्रिकेट सामने हे सट्टेबाज आणि पोलिस दलातील काहींना सुगीचे दिवस असतात. दोन महिने हा सट्टा चालणार असल्याचे सांगण्यात आले.
लाखो रुपयाची उलाढाल होणार्या या अवैध व्यवसायात शहरातील अनेक डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी सहभागी असल्याचे सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यातल्या अवैध व्यवसायावर अंकुश मिळविण्यासाठी फ्लश आऊट योजना आणली. त्यांतर्गत अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली पण क्रिकेट सामन्यावर सट्ट्याबाबत अद्याप पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेडसह हदगाव, किनवट, बिलोली, भोकर आदी पोलीस ठाण्यांर्तगत क्रिकेट सामन्यावरील सट्टा जोरात सुरु असल्याचे सांगण्यात आले.
नांदेड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी शुक्रवारी संपन्न झाली. विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायाबाबत खेद व्यक्त करताना मला सर्व गोष्टींची माहिती मिळते. त्यामुळे नागरिकांचा विश्वास मिळविण्यासाठी अधिकार्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
नागपूर येथे दोन आठवड्यापूर्वी झालेल्या दंगलीनंतर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सायबर सेलच्या अधिकार्यांना विशेष सूचना केल्या होत्या. पसरविण्यात येणा-या बातम्या, अफवा याबाबत सत्वर कारवाई करण्याचा सूचना त्यांनी केल्या. शिवाय अवैध व्यवसायाबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. पण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील काही कर्मचारी व अधिकारी अन्य कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.
क्रिकेटवरील सट्टा बेटिंगबाबत पोलीस अधिक्षकांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे दोन पथकं कारवाईसाठी तैनात करण्यात आली आहेत. सट्टाबाजार करणारे दररोज वेगवेगळी ठिकाणे बदलत असल्याने कारवाईत अडचणी येत आहेत. खात्रीशीर माहितीनंतर लवकरच या संदर्भात कारवाई करण्यात येईल.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग