अलिबाग: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अवमान कारक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी उगले यांच्या समोर ही सुनावणी सुरू होती.
केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी कोकणात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. यात्रेदरम्यान रायगड जिल्ह्यात महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. तेंव्हाच्या शिवसेनेने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर महाड शहर पोलिस ठाण्यात राणे यांच्या विरोधात भादवीच्या विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राणे यांचे अटकनाट्य रंगले होते.
अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी उगले यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. राणे यांचे वकील ॲड. सतीश मानेशिंदे यांनी जोरदार युक्तिवाद करताना राणे यांच्या वर शिक्षा करण्याइतका गुन्हा गंभीर नसल्याने तसेच पुरेसा पुरावा दोषारोप पत्रात दिसत नसल्याने त्यांना दोषमुक्त करण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. ती न्यायालयाने मान्य केली, त्यानुसार नारायण राणे यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. ॲड. अंकित बंगेरा, ॲड. महेश मोहिते यांनी देखील यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.