भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाबाबत केलेल्या विधानावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना खोचक सवाल विचारला आहे. रमेश मोरे आणि जया जाधव यांची हत्या का झाली? असा प्रश्न नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ते रत्नागिरी येथे जाहीरसभेत बोलत होते.
नारायण राणे भाषणात म्हणाले, “मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की, तुम्ही आमच्या देवेंद्रजींच्या परिवाराबद्दल बोलता मग रमेश मोरे आणि जया जाधव यांची हत्या का झाली, हे सांगाल का? हे सांगण्याची नैतिकता तुमच्यात आहे का? हा प्रश्न उद्धव ठाकरेच्या घरातील आहे. उद्धव ठाकरेंच्या घरातील अंतर्गत प्रश्न असल्यामुळे आमचा सोबती रमेश मोरे आणि जया जाधव गेला. याला कारण हेच लोक आहेत. आपल्या कुटुंबाबद्दल जरा कुठे काही कळलं की त्याची नकळत हत्या करतात. उद्धव ठाकरे स्वत: हत्या करत नाहीत. ते हत्या हा शब्दही उच्चारत नाहीत.”
हेही वाचा- “नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणं अयोग्य”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत
“पण हा माणूस खोक्यांवर बोलतो. पण आहो उद्धवजी, आम्ही खोके दिले नसते तर मातोश्रीची पहिली इमारतही उभारली नसती. दुसऱ्या इमारतीचा तर प्रश्नच सोडा. मनोहर जोशींनंतर मी दुसरा नेता आहे, ज्याने खोके द्यायला सुरुवात केली. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे त्यांच्यावरही नाराज होते. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. तेव्हापासून तुमच्याकडे जे-जे आलं, ते कुठून आलं? त्या बॅगांमध्ये काय होतं? आम्ही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अमरुद आणलं होतं का? ते तुम्ही घेतलं. तुम्ही कोणता धंदा किंवा व्यवसाय करता?” असा सवालही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.