अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यास प्राधान्य असले तरी त्यासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करून मित्र पक्षांशी जागावाटप करेल, जेथे शक्य नाही तेथे मैत्रीपूर्ण लढती केल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका व जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचे प्रयत्न केले जातील, असे पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष (दक्षिण) माजी आमदार दादा कळमकर यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची आढावा बैठक आज, रविवारी राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष कळमकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष (उत्तर) संदीप वर्पे, रावसाहेब म्हस्के, महिला जिल्हाध्यक्ष योगिनी राजळे, युवकचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांच्यासह दक्षिण जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचे खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार, माजीमंत्री प्राजक्त तनपुरे हे पक्षाच्याच बैठकीसाठी मुंबई येथे गेल्याने अनुपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ‘ऑपरेशन लोटस’ जाहीर केले आहे. त्याचे लक्ष्य शरद पवार गटाकडे आहे, याकडे लक्ष वेधले असता जिल्हाध्यक्ष कळमकर म्हणाले, ज्यांचे हात दगडाखाली आहेत ते त्यांच्याकडे जातील. जे लाभधारक होऊ इच्छित नाहीत, अशी सर्वसामान्य माणसे आमच्याबरोबर आहेत. माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळकेही पक्षाबरोबरच राहणार आहेत. शिवाजी महाराजांनी मावळे जमा करूनच महाराष्ट्र धर्म जागवला, त्याच पद्धतीने आम्ही काम करू.

१९९९ मध्येही अशीच परिस्थिती होती

सन १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळीही पक्ष सध्या सारखाच विस्कळीत होता, परंतु तरीही आम्ही चिकाटीने पहिल्याच निवडणुकीत जिल्हा परिषद व जिल्हा बँक ताब्यात घेतली होती. कारण पवारांविषयी लोकांमध्ये विश्वास होता. नंतर पक्ष जिल्ह्यात ‘शक्तिमान’ झाला, अशी आठवण जागवत जिल्हाध्यक्ष कळमकर म्हणाले, सध्याही पक्ष अडचणीत असला तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंग झाडून काम केले तर पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेऊ.

भाजपचा ‘बाऊ’ करू नये

दादा कळमकर म्हणाले, कार्यकर्त्यांनी भाजपाचा ‘बाऊ’ करू नये, त्यांनी किती पैसे वाटू द्या, मते मात्र जिल्ह्यात शरद पवारांच्या पक्षाला मिळणार आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनेक ‘कुटाणे’ केले, मतचोरी केली, म्हणून त्यांची सत्ता आली. आपल्या कार्यकर्त्यांनी केवळ मतदानाच्या दिवशी सायंकाळी दोन तास मतदान केंद्रांवर आलेल्या मतदारांची चाळणी करावी, मतदान केंद्रात कार्यकर्ते उपस्थित नसल्याचा गैरफायदा ते घेतात.

जनता भाजपच्या सभा होऊ देणार नाही

अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई नाही, शेतीमालाला भाव नाही, भाजप सरकारने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय करून ठेवली आहे, कर्जमाफीबद्दल फसवणूक केल्याने जनता भाजपच्या प्रचार सभाही होऊ देणार नाही, असा दावाही दादा कळमकर यांनी केला.