Sunil Tatkare On Raj Thackeray : महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यावर राज्य सरकारकडून महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून या योजनेची मोठी चर्चा सुरु आहे. मात्र, या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. विरोधक लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका करत आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना लाडकी बहीण योजनेवरुन टीका केली आहे. “सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल”, असं म्हणत राज ठाकरेंनी महायुतीवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. यानंतर राज ठाकरे यांच्या टीकेला सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर देत योजनेला स्वार्थी म्हणणं हा अडीच कोटी महिलांचा अपमान आहे, असं म्हटलं आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे काय बोलले? याबाबत मला काही माहिती नाही. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वार्थी आहे, असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान आहे असं मी मानतो. आता राज ठाकरे नेमकी कोणत्या हेतूने बोललेत हे मला माहिती नाही. पण तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून मी बोलत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे यांचं जर ते वाक्य असेल तर ते योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे”, असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलं.

हेही वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंचं भाष्य, “महिलांना अशाप्रकारे पैसे देणं…”

‘प्रणिती शिंदेंनी आत्मपरीक्षण करावं’

खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, “एखाद्या योजनेबाबत बोलत असताना महिलांना लालच दाखवली अशा प्रकारचा शब्द प्रयोग करणं म्हणजे त्या महिला असतानाही महिलांचा अपमान करत असल्याचं त्या विसरत आहेत. मला वाटतं की, प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्यावर आत्मपरीक्षण करावं आणि योग्य भूमिका घ्यावी. तुमचा राजकीय विरोध मी समजू शकतो. महायुतीच्या सरकारला किंवा नेतृत्वाला तुम्ही दोष द्या. मात्र, अशा प्रकारचं वक्तव्य का करता? हे मला काही कळत नाही. ज्यांनी निवडणूक लढवेली आहे, त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं हे दुर्देवी आहे”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंनी कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलं?

“ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही”, अशा मुद्द्यांवर राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना भाष्य केलं होतं.