Narhari Zirwal : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही झालं. मात्र, सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरी अद्याप पालकमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यातच आता महायुतीमधील मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या मंत्र्यांकडे जाणार? कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या पक्षाकडे जाणार? याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासंदर्भातील निर्णय कधी होतो? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

पण याआधीच भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मंत्र्यांकडून जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा सांगण्यास सुरुवात झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पालकमंत्री पदासंदर्भात बोलताना मोठं भाष्य केलं आहे. एवढंच नाही तर नरहरी झिरवाळ यांनी आपण कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहोत याची थेट यादीच सांगून टाकली आहे. तसेच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतही मोठं भाष्य त्यांनी केलं आहे.

हेही वाचा : Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

नरहरी झिरवाळ काय म्हणाले?

“मला नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यासाठी लोकांचा आग्रह आहे. पण मी सांगितलंय की, मला नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद नको. कारण पुणे, नाशिक हे नागपूरच्याही खूप पुढे विकासाच्या बाबतीत आहेत. विकासाच्या बाबतीत नाशिक तर एक नंबरला आहे. तसेच नाशिक जिल्हा आर्थिक देखील सक्षम आहे. त्यामुळे मी मागणी केली आहे की, मला एक किंवा दोन छोटे-छोटे जिल्हे द्या. मात्र, आदिवासी जिल्हे द्या”, असं नरहरी झिरवाळ यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झिरवाळ पुढे बोलताना म्हणाले की, “खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की, मला गोंदिया जिल्ह्याला घेऊन जायचं आहे. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. आता गडचिरोली जिल्ह्यासाठी भरपूर लोकांची मागणी आहे. मात्र, मी या दोन ते चार जिल्ह्यापैकी मागणी केलेली आहे. तसेच पालघर द्या, ठाणे द्या, नंदुरबार द्या, कोणताही जिल्हा द्या, पण आदिवासींचा जिल्हा द्या. मी आदिवासी आहे म्हणून नाही. पण मी समाजाचं काहीतरी देणं लागतो ते देणं त्यानिमित्ताने परत करण्याची संधी मिळेल”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.