सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या वाहनांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी जानराववाडी (ता. मिरज) येथे घडला. मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी मोटारींच्या मागील काचेचे नुकसान झाले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. नायकवडी आज मिरज पूर्व भागात दौऱ्यावर होते. त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि पक्षाचे पदाधिकारी होते. चाबुकस्वार वाडी येथील बैठक आटोपून जानराव वाडी येथे येत असताना लिमये मळा परिसरात त्यांच्या मोटारीवर अज्ञातांकडून दगड भिरकावण्यात आले. यामुळे मोटारीची मागील काच फुटली असल्याचे आ. नायकवडी यांचे पुत्र माजी नगरसेवक अतहर नायकवडी यांनी सांगितले.
हा प्रकार घडला त्यावेळी आ. नायकवडी दुसऱ्या मोटारीत श्री. घोरपडे यांच्या सोबत होते. आठ दिवसांपूर्वी आ. नायकवडी यांना धमकीचे पत्र आले असून, याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद व्यक्तींकडून टेहळणी केली जात असल्याचेही अतहर नायकवडी यांनी सांगितले.