रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना आडनाव बदलून ‘आगलावे’ लावावं असा सल्ला दिला आहे. सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना सदभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. दरम्यान त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिलं आहे.

सदाभाऊ खोत काय म्हणाले?

“शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं. हे राज्य होरपळून निघालं असून आता थांबलं पाहिजे,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात बोलताना केली आहे.

शरद पवारांचं आयुष्य आग लावण्यातच गेलं; सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य; म्हणाले “त्यांनी पवार आडनाव बदलून…”

अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर –

“शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत…तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वत: बोलत नाहीत. यांचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत असं माझं स्पष्ट मत आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले की. “आग लावण्याचं भारतातील काम भाजपा करत आहे. आपलाच पक्ष आग लावण्याचं काम करत असून शरद पवारांचं नाव घेत आहेत. भाजपापासून महाराष्ट्राला धोके निर्माण झाले असून आग कोण लावत आहे हे सर्वांना माहिती आहे. सदाभाऊंच्या बोलण्याला पक्षात काही महत्व नाही. पुढील आमदारकी भेटावी यासाठी त्यांची ही धडपड आहे”.