भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. बावनकुळेंनी भाजपा पदाधिकाऱ्यांना सल्ला देताना विरोधी बातम्या न येण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या असं विधान केलं होतं. त्या विधानावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांची तशी प्रतिमा नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

चंद्रशेखर बालवनकुळेंनी २४ ऑगस्ट रोजी अहमगनगरच्या सावेडी येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आगामी निवडणुकांसाठी तयारीसंदर्भातही चर्चा झाली. कार्यकर्त्यांना सल्ला देताना माध्यम प्रतिनिधी वा पत्रकारांना कसं हाताळायचं, यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं. “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा”, असं विधान बावनकुळेंनी केलं. याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली.

“पत्रकारांनी आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी…”, भाजपा पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सल्ल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

या विधानानंतर भाजपाच्या राज्यातील अनेक वरीष्ठ नेत्यांनी बावनकुळेंच्या बाजूने भूमिका मांडताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यावर सूचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर असून गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही ते घेणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांना पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाबाबत विचारणा केली असता त्यांनी या विधानाला फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याची भूमिका मांडली. “आता काय त्या विधानाला महत्त्व द्यायचं एवढं. महाराष्ट्रातले पत्रकार या गोष्टींची अपेक्षा करत नाहीत. महाराष्ट्रातले कोणते पत्रकार ढाब्यावर जाण्यासाठी, चहासाठी भुकेले आहेत? महाराष्ट्राच्या पत्रकारांची अशी प्रतिमा नाही. असं वक्तव्य करणं म्हणजे समस्त पत्रकार वर्गाचा अवमान आहे. अशी भूमिका जे घेतात, त्यांच्याबद्दल काय बोलावं? माझ्यामते अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवं”, असं ते म्हणाले.