अतिवृष्टीनेग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या, सरकार म्हणतंय मदत करतो मात्र मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचे बोलणेच जास्त आणि कामात शुन्य आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सिंचन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या चर्चांवरुन भाजपाचे नेते कंबोज यांना आव्हान दिलं आहे.

नक्की वाचा >> सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? कंबोज म्हणाले, “अरे भावा, आज…”

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याप्रमाणे लवकरच तुरुंगात जाईल, असे संकेत भाजप नेते मोहित कंबोज यांनी बुधवारी दिले. राज्यातील सिंचन गैरव्यवहार प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन महासंचालक परमबीर सिंह यांच्या काळात २०१९ मध्ये बंद करण्यात आले होते. याप्रकरणी पुन्हा चौकशी सुरु करावी, अशी मागणी कंबोज यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आम्ही घाबरत नाही असं म्हणतं कंबोज यांना आव्हान दिलं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?
मूळ प्रश्नाकडे बगल देण्यासाठी सिंचन चौकशीच्या वावड्या उठवल्या जात आहेत. १५ वर्षे जुन्या गोष्टी उकरून काढून विरोधकांना बदनाम करण्याची ही चाल आहे. सध्याच्या सरकारचे ते कामच आहे मात्र आम्ही काही घाबरत नाही, आम्ही विरोधक म्हणून आपली जबाबदारी पार पाडू असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन शिंदे सरकारला लक्ष्य करताना जयंत पाटील यांनी, सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे व्यस्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे यांचे दुर्लक्ष आहे असा आरोपही केला आहे.

कंबोज यांच्या चौकशीची मागणी
मोहित कंबोज यांना कोण माहिती देत आहे, ते अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाऊन रोज बसत आहेत का आणि त्यांना ईडीसह अन्य तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती कशी मिळते, याची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विरोधकांना धमकावण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईची भीती दाखविली जात असल्याचा आरोप कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.